JEE Result : देशात पहिला आलेला कार्तिकेय स्मार्टफोन, सोशल मीडियापासून दूरच
जेईई ऍडव्हान्स परीक्षेतील टॉपर कार्तिकेय हा महाराष्ट्रातील चंद्रपूरचा रहिवासी आहे.
मुंबई : जेईई ऍडव्हान्स (JEE Advanced Result 2019) चे निकाल आज जाहीर करण्यात आलेत. या निकालात 'एज्युकेशन हब' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटानं पुन्हा एकदा आपली ओळख ठसठशीतपणे समोर आणलीय. मूळचा महाराष्ट्रचा रहिवासी असणारा परंतु, मुंबईतून कोचिंग घेणारा कार्तिकेय गुप्ता या विद्यार्थ्यानं यंदाच्या निकालात देशात पहिला क्रमांक मिळवलाय. कार्तिकेयनं जेईई ऍडव्हान्स परीक्षा २०१९ मध्ये ३७२ पैंकी ३४६ गुण मिळवत ऑल इंडिया प्रथम रँक प्राप्त केलीय. कार्तिकेय हा महाराष्ट्रातील चंद्रपूरचा रहिवासी आहे. कार्तिकेय यापूर्वी जेईई मेन परीक्षेत १०० पर्सेन्टाईल स्कोअर करून ऑल इंडियात १८ वा रँक तसंच महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. याच वर्षी बारावीच्या परीक्षेत त्यानं ९३.७ टक्के गुण मिळवलेत.
आयआयटी मुंबईत सीएस ब्रान्च मिळाल्यानंतर मी निश्चिंत होतो. पण, देशात पहिला क्रमांक येईल, असा मी विचारही केला नव्हता, अशी प्रतिक्रिया या निकालानंतर कार्तिकेयनं दिलीय.
काही प्रश्न असले तर शिक्षकांनी नेहमीच मदत केली. खूप चांगला अभ्यास करणारे मित्र इथं मिळाले. नियमित लेक्चरनंतर ६ ते ७ तासांचं स्वतंत्र वेळापत्रक बनवून अभ्यास केला. स्वत:च मॉक टेस्टही दिल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, एखाद्या दिवशी एखादा प्रश्न अडला तर तो प्रश्न त्याच दिवशी निकालात काढून मगच झोपणं हा नियम स्वत:ला घालून दिला, असं सांगत त्यानं आपल्या यशाचं गमक सर्वांसोबत शेअर केलंय.
मुख्य म्हणजे, जेईई ऍडव्हान्समध्ये टॉप करणारा कार्तिकेय सोशल मीडिया वापरत नाही. की-पॅडसहीत फोन तो वापरतो. आयआयटी मुंबईमध्ये सीएस ब्रान्चमधून इंजिनिअरिंग पूर्ण करण्याचं आपलं स्वप्न प्रत्यक्षात येणार म्हणून तो सध्या खूपच खूश आहे.
कार्तिकेयचे वडील चंद्रेश गुप्ता पेपर इंडस्ट्रीत जनरल मॅनेजर पदावर काम करतात तर आई पूनम गुप्ता गृहिणी आहे. ते चंद्रपूरमध्ये राहतात. परंतु, ते सतत कार्तिकेयच्या संपर्कात असतात.