नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 हून अधिक जवान मारले गेले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी स्वीकारली. आदिल अहमद दार या दहशतवाद्याने आत्मघातकी हल्ला करत हा स्फोट घडवून आणला. पण हल्ल्यामागचे सूत्रधार वेगळे होते. त्यातील एक रशीद गाझी याचा भारतीय जवानांनी खात्मा केला. गाझी ज्या इमारतीत लपला होता ती इमारतच बॉम्बने उडवण्यात आली. भारतीय जवानांना मिळालेले हे महत्त्वाचे यश मानले जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवार रात्रीपासूनच लष्कराची दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे.  काही महिन्यांपूर्वी जैश-ए-मोहम्मद चा म्होरक्या मसूद अजहर आपला पुतण्या उस्मान आणि भाचा तल्हा रशीद यांच्यामार्फत घाटीमध्ये दहशतवाद पसरवत होता. ऑपरेशन ऑलआऊट दरम्यान दरम्यान जवानांनी त्याचा खात्मा केला. त्याआधी मसूद अजहरने आईईडी एक्सपर्ट गाजी रशिद याच्याकडे जबाबदारी दिली होती. 


गाझी आपल्या दोन मित्रांसोबत काश्मिरमध्ये दाखल झाला. तो दक्षिण काश्मीरमध्ये लपून राहायचा. तो हा मसूद अजहरचा खूप खास मानला जायचा. गाझी 2008 मध्ये जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेत सामील झाला. यासाठी त्याला तालिबानमध्ये ट्रेनिंग देखील देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 2010 मध्ये तो उत्तरी वजीरिस्तान येथे आला आणि त्याला मसूद अजहरच्या जवळ जाण्याची संधी मिळाली. 


14 फेब्रुवारीला गुरुवारी पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला झाला. यानंतर जवानांनी या घटनेशी संबंधित दहशतवाद्यांना संपविण्यासाठी कंबर कसली आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेला पाकिस्तान पाठीशी घालत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला अडचणीत आणण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.