नवी दिल्ली : तेल कंपनी सौदी अरामकोवर ड्रोन हल्ला झाल्याच्या २५ दिवसानंतर सलग दुसऱ्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती घटल्या आहेत. २५ दिवसांनंतर पहिल्यांदाच दरात इतकी  घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी देखील या दरात घसरण पाहायला मिळाली. आज दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमतीत १८ पैसे प्रति लीटर तर डिझेलच्या किंमतीत ८ पैसे प्रति लीटर घसरण पाहायला मिळाली. याआधी गेल्या २५ दिवसांत पेट्रोलच्या किंमतीत ३ रुपयांची वाढ झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीमध्ये आज पेट्रोल ७४.३३ रुपये आणि डिझेल ६७.३५ रुपये लीटर स्तरावर पोहोचले. मुंबईत पेट्रोल ७९.९३ रुपये प्रति लीटर तर डिझेल ७०.६१ रुपये प्रति लीटर किंमतीत आहे. कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोल अनुक्रम ७६.९६ आणि ७७.२२ रुपये तर डिझेल ६९.७१ रुपये आणि ७१.१६ असे दर आहेत. 



सौदी अरामकोवर हल्ल्यानंतर पेट्रोलच्या किंमतीत ३ रुपयांनी वाढ आली होती. तर डिझेल देखील दीड रुपयांनी वाढले होते. आता क्रूड ऑईलच्या किंमती स्थिर राहतील असे तज्ञांचे मत आहे. आज सकाळी ब्रेंट क्रूड ५७.२ डॉलर प्रति बॅरल आणि डब्ल्यूटीआय क्रूड ५२.६९ डॉलर प्रति बॅरल किंमतीपर्यंत पोहोचले.