Brij Bhushan Sharan Singh : भारतीय पैलवान विनेश फोगट, साक्षी मलिक, सुमित मलिक आणि बजरंग पुनिया नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन करत आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Wrestling Federation Of India Chief) गेल्या अनेक वर्षांपासून महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण करत असल्याचा धक्कादायक आरोप विनेश फोगटने (Vinesh Phogat) केला आहे. लखनऊतील राष्ट्रीय शिबिरातील काही प्रशिक्षकांनीही महिला कुस्तीपटूंचं शोषण केल्याचा आरोप आहे. यानंतर सरकारने चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नेमली आहे. 


पण यानिमित्ताने वादात अडकलेले बृजभूषण सिंह कोण आहेत हे जाणून घेऊयात - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बृजभूषण सिंह हे भाजपाचे उत्तर प्रदेशातील कैसरगंजमधून खासदार आहेत. ते 2011 पासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षही आहेत. सहावेळा खासदार राहिलेल्या बृजभूषण सिंह यांनी गोंडा, कैसरगंज आणि बलरामपूर मतदारसंघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. 


बृजभूषण सिंह उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्याचे रहिवासी असून तरुणपणी कुस्तीपटू होते. 1980 मध्ये त्यांनी विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला. अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी झालेल्या चळवळीत सहभागी झाल्यानंतर आपल्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे ते प्रसिद्धीस आले होते. 


बृजभूषण सिंह यांनी 1991 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढली होती. 2009 मध्ये कैसरगंज मतदारसंघातून ते विजयी झाले. 2014 लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपाच्या तिकीटावरच त्यांनी 2014 आणि 2019 लोकसभा निवडणूक जिंकली. 


बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसह बृजभूषण सिंहदेखील आरोपी होते. कोर्टाने नंतर त्यांची सुटका केली होती. 


बृजभूषण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केल्यामुळे महाराष्ट्रात बरीच चर्चा रंगली होती. जर राज ठाकरेंनी अयोध्येत प्रवेश केला तर त्यांना धडा शिकवू असा इशारा त्यांनी दिला होता. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला होता. 


दरम्यान फोगटने केलेल्या आरोपांवर भाष्य करताना बृजभूषण सिंह यांनी सांगितलं आहे की "माझ्यावर करण्यात आलेले लैंगिक शोषणाचे आरोप खोटे आहेत. जर माझ्यावर करण्यात आलेले आरोप खरे ठरले तर फाशी घेईन".