Loan Settlement: तसं पाहिलं तर कर्ज घेण्याचं कोणचीही इच्छा नसते. पण काही वैयक्तिक कारणांमुळे कर्ज घेण्याची वेळ येते. कर्ज घेतल्यानंतर व्याजाचा डोंगर डोक्यावर असतो. अनेकदा काही कारणांमुळे कर्जाचे हफ्ते वेळेवर फेडता येत नाही. त्यामुळे बँक कर्जाच्या हफ्त्यासाठी तुमच्या पाठी तगदा लावते. तुम्ही तुमच्या कर्जाचे हफ्ते सलग 91 दिवस न केल्यास बँक नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (NPA) म्हणून वर्गीकृत करते. तुमच्या विनंतीनंतर, बँक तुम्हाला वन टाईम सेटलमेंट (OTS) ऑफर करते. OTS मध्ये, डिफॉल्टरला प्रिंसिपल अमाउंट पूर्ण भरावी लागते.  व्याजाची रक्कम आणि दंड आणि इतर शुल्क अंशतः किंवा पूर्णपणे माफ केले जाते. काही प्रकरणांमध्ये, मूळ रकमेमध्ये काही सूट देखील दिली जाते. पण बँकेने दिलेला हा पर्याय निवडावा का? त्याबद्दल येथे जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोन सेटलमेंट म्हणजे काय?


आर्थिक घडामोडी सल्लागार शिखा चतुर्वेदी यांनी सांगितलं की, लोन सेटलमेंट केल्याने, तुमची वसुली एजन्सीपासून सुटका होते. कर्जदार बँकेशी सहमत असलेल्या अटी व शर्तींचे पालन करून थकबाकी भरू शकतो. परंतु लोन सेटलमेंटला लोन क्लोजर असं समजू नका. कर्जदाराने सर्व ईएमआयची परतफेड केल्यानंतरच कर्ज बंद होते.


लोन सेटलमेंटमुळे काय नुकसान होतं? 


लोन सेटलमेंट म्हणजे कर्जदाराकडे कर्जाची परतफेड करण्यासाठी पैसे नाहीत असा होतो. या प्रकरणात कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर कमी होतो. म्हणजेच 50 ते 100 पॉईंटने किंवा त्यापेक्षा अधिक पॉईंट्स कमी होऊ शकतात. कर्जदाराने एकापेक्षा जास्त क्रेडिट खाते सेटल केले तर क्रेडिट स्कोअर आणखी कमी होऊ शकतो. क्रेडिट रिपोर्टमध्ये अकाउंट सेक्शनमध्ये कर्जदाराचे कर्ज पुढील सात वर्षांसाठी सेटल झाल्याचा उल्लेख असू शकतो. अशा परिस्थितीत पुढील सात वर्षांसाठी पुन्हा कर्ज घेणे जवळपास अशक्य होते. तुम्हाला बँकेकडून काळ्या यादीत टाकले जाऊ शकते.


काय केले पाहिजे?


आर्थिक घडामोडी सल्लागार शिखा चतुर्वेदी यांनी सांगितलं की, जर तुमच्याकडे कर्ज सेटलमेंटशिवाय दुसरा पर्याय नसेल, तर त्या वेळी तुम्ही अर्थातच हा पर्याय निवडू शकता. परंतु सेटल केलेले खाते क्लोज्ड खात्यात रूपांतरित करण्याचा पर्याय देखील आहे. जेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल, तेव्हा बँकेत जा आणि सूट मिळाली आहे ती म्हणजे मुद्दल, व्याज, दंड आणि इतर शुल्क भरण्याची तयारी दाखवा. हे पेमेंट केल्यानंतर बँकेकडून नो ड्यू पेमेंट मिळते. यानंतर बँक क्रेडिट ब्युरोला तुमचे अकाउंट क्लोज्ड केल्याचं सांगते. यामुळे तुमचा खराब क्रेडिट स्कोर देखील सुधारतो.