मुंबई : जेवणात कितीही प्रकारचे मसाले घाला, किंवा त्याला काहीही करा पण जर जेवणात मीठ नसेल तर, जेवण तुम्हाला रुचकर लागणारच नाही. त्यामुळे मीठ हे जेवणातील अत्यावश्यक घटक आहे. परंतु तो वापरण्यासाठी एक मर्यादा आहे, मीठ जर जास्त प्रमाणात आपल्या शरीरात गेले तर, ते आपल्या शरीरासाठी अपायकारक ठरु शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) मीठ खाण्याविषयी गाइडलाइन प्रसिद्ध केली आहे. तसेच, अभ्यासानंतर WHO ने असा इशारा दिला आहे की, दरवर्षी सुमारे तीन दशलक्ष लोकांचा मृत्यू हा जास्त प्रमाणात मीठ शरीरात गेल्याने झाला आहे. WHO च्या म्हण्यानुसार मानवी शरीराला एका दिवसात 5 ग्रॅम मीठ पुरेसे आहे.


हृदय रोग आणि स्ट्रोकचा धोका


वास्तविक आपल्या शरीरात सोडियम आणि पोटॅशियम दोन्ही आवश्यक आहेत. परंतु जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात सोडियमची मात्रा जास्त होते, त्यामुळे पोटॅशियम आणि सोडियमचे प्रमाण असमतोल होते. सोडियमच्या अधिकतेमुळे हाडे कमकुवत होतात आणि हाय बीपी होतो. यामुळे ब्रेन स्ट्रोक, हृदयाशी संबंधित आजारांचा धोका तसेच मूत्रपिंडावर त्याचा वाईट परिणाम होण्याचा धोका आहे.


5 ग्रॅम मीठ शरीराच्या गरजा पूर्ण करते


WHO च्या मते, एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील सोडियमची आवश्यकता पाच ग्रॅम मीठाने पूर्ण होते. परंतु आपल्यापैकी बरेच जण दिवसभरात सरासरी 9 ते 12 ग्रॅम मीठ खातात. WHO च्या अभ्यासानुसार प्रोसेस्ड फूड, पॅकेज फूड, डेअरी आणि मांस यांमध्ये सर्वाधिक मीठ असते. WHO च्या म्हणण्यानुसार, मीठ समतोल प्रमाणात खाल्ल्यास जवळपास अडीच दशलक्ष लोकांचा मृत्यू टाळता येईल.


कोणत्या पदार्थात किती सोडियम?


WHO ने पदार्थांमधील सुधारासाठी आणि लोकांचे जीव वाचविण्यासाठी 60 पेक्षा जास्त खाद्य पदार्थांमधील कॅटेगरीमध्ये सोडियमच्या पातळीसाठी नवीन गाइडलाईन्स तयार केले आहेत. WHOच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, 100 ग्रॅम बटाटा चिप्समध्ये 100 मिलीग्रामपेक्षा जास्त सोडियम असू नये. तसेच पेस्ट्रीमध्ये 120 मिलीग्राम आणि प्रोसेस्ड मीटमध्ये 30 मिलीग्रामपर्यंत सोडियम पुरेसे आहे.


मीठ का महत्वाचे आहे?


मीठाचे सेवन शरीरासाठी महत्वाचे आहे कारण, त्याचे बरेच फायदे आहेत. मीठ हे शरीर हायड्रेट करण्याचे कार्य करते. सिस्टिक फायब्रोसिसची लक्षणे सुधारते. थायरॉईड ग्रंथीचे कार्य योग्य प्रकारे करण्यास मदत करते. हे कमी बीपी असलेल्या रूग्णांसाठीही फायदेशीर आहे. पण आवश्यकतेनुसार ते खावे. जास्त मीठ आरोग्यासाठी घातक ठरू शकते.