टॉसमध्ये हरवत भारताने पाकिस्तानकडून मिळवली राष्ट्रपतींची बग्गी
स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक गोष्टींवरुन वाटणी झाली होती. यात गर्व्हनर जनरल्स बॉडीगार्ड्स रेजिमेंटही होती.
नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक गोष्टींवरुन वाटणी झाली होती. यात गर्व्हनर जनरल्स बॉडीगार्ड्स रेजिमेंटही होती.
या रेजिमेंटची विभागणी 2:1 अशी करण्यात आली होती. मात्र रेजिमेंटच्या प्रसिद्ध बग्गीवरुन दोन्ही देशांमध्ये वाद सुरु झाला. ही खास बग्गी आपल्याकडेच असावी असे भारत आणि पाकिस्तान या दोघांना वाटत होते. यावेळी हा वाद सोडवण्यासाठी तत्कालीन गर्व्हनर जनरल्स बॉडीगार्ड्सचे कमांडेट आणि त्याचे डेप्युटी यांनी टॉसचा आधार घेतला.
टॉस उडवला आणि निकाल जाहीर
टॉसच्या मदतीने बग्गीवरुन भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद मिटवण्यात आला. गर्व्हनर जनरल्स बॉडीगार्ड्सने दोन्ही पक्षांच्या समोर टॉस उडवला आणि यात भारताने टॉस जिंकला. यासोबतच राष्ट्रपतींची शान मानली जाणारी बग्गी भारताच्या ताब्यात आली.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी वापरली जायची बग्गी
1950मध्ये पहिल्यांदा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला होता. तेव्हा देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद याच बग्गीतून बसून सोहळ्यापर्यंत आले होते. या बग्गीतून राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद शहराचा दौराही करायचे.
या बग्गीतून राष्ट्रपती येण्याची परंपरा अनेक वर्षे सुरु होती. मात्र इंदिरा गांधी हत्याप्रकरणानंतर सुरक्षेच्या कारणास्तव ही परंपरा थांबवण्यात आली. यानंतर राष्ट्रपती बुलेटप्रूफ गाडीतून येऊ लागले.
प्रणव मुखर्जींनी बदलली परंपरा
राष्ट्रपती बुलेट प्रूफ गाडीतून येण्याच्या परंपरेत 2014मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बदल केला. तब्बल 20 वर्षानंतर प्रणव मुखर्जी 29 जानेवारीला झालेल्या बीटिंग रिट्रीट सोहळ्यात पोहोचले.
घोडेही असतात खास
राष्ट्रपती यांच्या बग्गीला जोडण्यात येणारे घोडेही विशिष्ट जातीचे असतात. हे घोडे भारतीय आणि ऑस्ट्रेलियन घोड्यांच्या मिक्स ब्रीडचे असतात. या घोड्यांची उंची इतर घोड्यांच्या तुलनेत जास्त असते.