Crime News : पत्नी गरोदर, तात्रिकाने सल्ला दिला अन् स्क्रू ड्रायव्हरने... चिमुकलीच्या हत्येने खळबळ
Kolkata Child Death : कोलकातामध्ये घडलेल्या प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. मुलगी सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाली आणि परत कोणालाच दिसली नाही. इमारतीमध्येच राहणाऱ्या एका व्यक्तीच्याच घरात मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
Kolkata Child Death : पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकातामधून (Kolkata Crime) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोलकाता येथील तिलजाला (Tiljala police station) येथे एका 6 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्या झालेली मुलगी सकाळी 7 वाजल्यापासून बेपत्ता होती. रात्री जवळच असलेल्या एका फ्लॅटमधून मुलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. शेजारी राहणाऱ्या (neighbour) एका व्यक्तीनेच या चिमुकलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. दुसरीकडे पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप करत स्थानिकांनी पोलीस ठाण्याची तोडफोड केली.
कोलकात्याच्या श्रीधर रॉय रोड येथे राहणारी मुलगी रविवारी सकाळपासून बेपत्ता झाली होती. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मुलीच्या कुटुंबीयांनी तिलजाला पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्यानंतर पोलिसांनी जवळच्या फ्लॅटमधील एका सुटकेसमधून मुलीची मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 32 वर्षीय आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई सुरू केली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी आलोक कुमार नावाच्या आरोपीला अटक केली आहे. चौकशीमध्ये आलोक कुमारने हत्येची कबुली दिली आहे. आलोक कुमार हा मूळचा बिहारच्या समस्तीपूरचा रहिवासी आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार प्रथमदर्शनी मुलीचे लैंगिक शोषण झाले होते. तिच्या डोक्यावर, कानावर आणि अनेक ठिकाणी स्क्रू डायव्हर्सनी छिद्रे केल्यासारख्या खुणा आहेत.
हत्या झालेली अल्पवयीन मुलगी कचरा टाकण्यासाठी गेली होती, असे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर ती परत आलीच नाही. मुलगी घरी न परतल्याने मुलीच्या वडिलांनी 12 वाजता पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कुटुंबियांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पोलीस त्यांच्या घरी गेले होते. पोलिसांनी त्या इमारतीमधीलसर्व 32 फ्लॅटची कसून चौकशी केली, मात्र पोलिसांना फारसे यश मिळाले नाही. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, अल्पवयीन मुलगी सीसीटीव्हीमध्ये शेजारच्या इमारतीत प्रवेश करताना दिसली होती. परंतु पोलिसांना फुटेज दाखवूनही त्यांना तपास करता आला नाही.
इमारतीमधील मुलगी बेपत्ता झाल्यानंतर सर्व रहिवाशी तिचा शोध घेत होते. मात्र यावेळी इमारतीमधील आलोक कुमार याचीच खोली रहिवाश्यांना बंद आढळली होती. संध्याकाळपर्यंत हे घर बंद असल्याने लोकांचा संशय बळावला. त्यांनी कुलूप तोडले तर घरात असलेल्या सुटकेसमध्ये बेपत्ता मुलीचा मृतदेह आढळून आला. आलोक कुमार यांच्याच फ्लॅटमध्ये मुलीचा मृतदेह सापडल्याच्या वृत्ताला कोलकाता पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
हत्येचे कारण आले समोर
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीच्या हत्येचे कारण सांगितले आहे. पत्नीचे अनेक गर्भपात झाल्याचे आरोपीने पोलिस चौकशीत सांगितले. ती पुन्हा गरोदर होती. त्यामुळे काही तांत्रिकांनी मला मानवी बळी देण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे मुलीची हत्या केली असे आरोपी आलोक कुमारने सांगितले.