Kolkata Rape Case: धक्कादायक CCTV फुटेज समोर! घटनेच्या 1 दिवस आधी आरोपीने पीडितेचा पाठलाग करत...
Kolkata Rape And Murder Case Shocking CCTV Footage: कोलकात्यामधील धक्कादायक घटना 9 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर घडली. या प्रकरणामधील एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणांच्या हाती लागलं असून त्याहून मोठा खुलासा झाला आहे.
Kolkata Rape And Murder Case Shocking CCTV Footage: संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या कोलकाता येथील आर. जी. कर हॉस्पीटल आणि मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये रोज नवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपी संजय रॉयला अटक केली आहे. संजय रॉयच्या पॉलीग्राफी चाचणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायलयामध्ये या प्रकरणी बुधवारी सुनावणीचा दुसरा टप्पा पार पडला. असं असतानाच आता 9 ऑगस्टच्या रात्री घडलेल्या या पाशवी बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या एक दिवस आधीचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. आरोपी संजय रॉयने दिलेल्या कबुली जबाबानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याच्या दाव्याचं समर्थन करणारा पुरावा तपास यंत्रणांना सापडला आहे.
एक दिवस आधीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय दिसलं?
संजय रॉयने दिलेल्या कबुली जबाबामध्ये त्याने 31 वर्षीय महिला डॉक्टरवर चौथ्या मजल्यावरील सेमीनार हॉलमध्ये बलात्कार करुन निघ्रृणपणे गळा दाबून हत्या केली. मात्र या घटनेच्या एक दिवस आधीच आपण या महिला डॉक्टरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केल्याचं संजय रॉयने तपासात सांगितलं आहे. त्याच्या या दाव्याला सीसीटीव्ही फुटेजमधून दुजोरा मिळाला आहे. यासंदर्भातील वृत्त सीएनएन-न्यूज 18 ने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. कोलकाता पोलिसांच्या तपासादरम्यान आरोपी संजयने मेडिसीन वॉर्डमध्ये पीडितेचा पाठलाग केल्याचं मान्य केलं. आपण 8 ऑगस्ट रोजी पीडितेचा पाठलाग केल्याचं आरोपीने सांगितलं. आरोपीच्या जबाबानंतर पोलिसांनी या वॉर्डमधील सीसीटीव्ही तपासलं असता पोलीस स्वयंसेवक म्हणून काम करणारा 33 वर्षीय संजय रॉय 8 ऑगस्टला मेडिकल वॉर्डमध्ये पाठलाग करताना व्हिडीओत दिसून आलं. संजय रॉय पोलीस स्वयंसेवक असल्याने त्याला हॉस्पीटलमध्ये अनेक वॉर्डमध्ये थेट प्रवेश करण्याची परवानगी होती. 8 ऑगस्टच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सकाळी 11 वाजता आरोपी संजय हा पीडितेचा पाठलाग करत तिच्या मागेमागे मेडिसीन वॉर्डमध्ये गेला होता. यावेळी पीडितेबरोबर अन्य चार प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर होत्या.
त्या पाच जणींकडे तो पाहत होता
"सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी रॉय हा या तरुणींकडे पाहत असल्याचं दिसत आहे," असं सूत्रांनी सांगितलं आहे. सीबीआयने या प्रकरणामध्ये तपासाची सूत्र हाती घेतली असून त्यांनी या सीसीटीव्हीमध्ये पीडितेबरोबर दिसणाऱ्या चारही महिला डॉक्टरांची चौकशी केली आहे. त्यांना संजय रॉय त्यांच्या पाठलाग करत असल्याचं जाणवलं होतं का? त्यांनी संजयला त्या दिवशी मेडिसीन वॉर्डमध्ये पाहिलेलं का? यासारखे प्रश्न विचारण्यात आल्याचे समजते.
नक्की वाचा >> Kolkata Rape Case: '150 मिलीग्रॅम वीर्य' असा उल्लेख ऐकताच CJI चंद्रचूड संतापून म्हणाले, 'पीडितेच्या..'
पीडित तरुणी रात्री 1 वाजता हॉलमध्ये गेली, त्यानंतर
सध्या तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित महिला डॉक्टर 9 ऑगस्ट रोजी रात्री 1 वाजण्याच्या आसपास सेमिनार हॉलमध्ये प्रवेश करत असल्याचं दिसलं आहे. सेमीनार हॉलजवळ पीडिता रात्री अडीचच्या सुमारास एका मैत्रीणीशी बोलत असताना शेवटची दिसल्याचं सूत्रांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सांगितलं आहे. ज्या तरुणीची पीडितेने चर्चा केली तिने, 'आमच्या गप्पांनंतर ती (पीडिता) पुन्हा झोपण्यासाठी सेमीनार हॉलमध्ये गेली,' असं सांगितल्याचं समजतं.
नक्की वाचा >> Kolkata Rape Case ला नवं वळण! आरोपीने पोलीस अधिकाऱ्याबरोबर काढलेल्या सेल्फीने खळबळ
आरोपी सेमिनार हॉलमध्ये शिरतानाचं सीटीटीव्ही फुटेज आलं समोर
9 ऑगस्टच्या सीटीटीव्ही फुटेजमध्ये पहाटे 4 वाजता आरोपी संजय रॉय याच सेमीनार हॉलमध्ये प्रवेश करताना दिसला आहे. याचवेळी त्याने पीडितेवर बलात्कार केल्याचं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं असून ते आरोपीच्या चौकशीमधून अधिक माहिती गोळा करत आहेत.