CJI Chandrachud On Kolkata Rape And Murder: सर्वोच्च न्यायालयामध्ये आज कोलकात्यामधील आर. जी. कर रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या 31 वर्षीय महिला डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी दुसऱ्यांदा सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी आर. जी. कर रुग्णालयामध्ये आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना कामावर पुन्हा रुजू होण्याचे आदेश सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी दिले आहेत. न्या. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस होता. न्यायालयाने या प्रकरणामधील आरोपीवर कठोर कारवाई करुन डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी हा प्रकार घडल्यापासूनच म्हणजेच 9 ऑगस्टपासून आंदोलन करत आहेत. हे आंदोलन मागे घेऊन डॉक्टरांनी कामावर जावं असं म्हटलं आहे. 


मी रुग्णालयात जमिनीवर झोपलोय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी डॉक्टरांच्या योगदानाबद्दल भाष्य केलं. मी स्वत: डॉक्टरांना 24 तास काम करताना पाहिलं आहे. माझ्या कुटुंबामध्ये एक सदस्य आजारी होता त्यावेळी एकदा मी रुग्णालयाच्या फरशीवर झोपलो होतो. त्यावेळी मी डॉक्टरांचं काम जवळून पाहिलं होतं, असं न्या. चंद्रचूड म्हणाले. पुढे बोलताना सरन्यायाधीशांनी, सर्व आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी कामावर परतलं पाहिजे असं सांगितलं.


सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांना दिला शब्द...


सर्व डॉक्टरांना रुग्णालय प्रशासनाने कामावर परतू दिलं पाहिजे. आम्ही यासंदर्भात काही सामान्य आदेश जारी करणार आहोत. आम्ही डॉक्टरांना आश्वासन देतो की जेव्हा डॉक्टर कामावर परततील तेव्हा अधिकाऱ्यांनी प्रतिकूल कारवाई न करण्यासाठी दबाव निर्माण करू. डॉक्टर कामावर परतले नाही तर सार्वजनिक प्रशासनाचं काम कसं चालणार? असा सवाल न्यायालयाने विचारला. कामावर परतल्यानंतर तुमच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असा शब्द कोर्टाने या आंदोलनकर्त्या डॉक्टरांना दिला आहे.


नक्की वाचा >> Kolkata Rape Case: '150 ग्रॅम वीर्य' असा उल्लेख ऐकताच CJI चंद्रचूड संतापून म्हणाले, 'पीडितेच्या..'


आंदोलनासाठी आणला जातोय दबाव


नागपूरमधील एम्समधील निवासी डॉक्टरांच्या वकिलांनी मुख्य न्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड, न्या. जे. बी. पारदीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाला, आंदोलन करावं यासाठी डॉक्टरांवर दाबव टाकून त्यांचा छळ केला जात आहे, असं सांगितलं. खंडपीठाने डॉक्टरांना कामावर परत रुजू व्हावं असं म्हटलं आहे. कामावर परतल्यानंतर काही अडचणी आल्या तर आमच्याकडे या, असं न्यायालयाने डॉक्टरांना सांगितलं आहे. कोलकात्यामधील हे प्रकरण समोर आल्यापासून देशभरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये डॉक्टरांनी आंदोलनं केली आहेत. ज्या रुग्णालयात हे घडलं तिथे तर 9 ऑगस्टपासून आंदोलन सुरु आहे. कोलकात्यामधील प्रकरणाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रामध्येही डॉक्टरांनी काही दिवस आंदोलन केलं होतं.