पाकिस्तानचा डाव त्या दोघींनी उधळून लावला
कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीचा अपमान आक्रमकपणे जगासमोर आणलाय.
अमित भिडे, झी मीडिया, प्रतिनिधी, मुंबई : कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीचा अपमान आक्रमकपणे जगासमोर आणलाय. त्याचवेळी एवढा अपमान होऊनही या दोघींनी जराही संयम ढळू दिला नाही. या सगळ्या गदारोळात लक्षवेधी ठरली जाधव परिवारातल्या या दोन महिलांची शांत संयमी छबी... भारतीय नौदलाचे माजी अधिकारी आणि व्यावसायिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलीय.
हेरगिरीचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आलाय. मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालयात या प्रकरणात पाकिस्तानचं थोबाड याआधीच फुटलंय. जाधव यांच्या फाशीला सध्या स्थगिती आहे. भारताचा हा या प्रकरणातला मोठा राजनैतिक विजय आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर मुखभंग झाल्यावर पाकिस्तानने मग जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाकिस्तानात येऊन भेटू देण्याची मानवतेची नाटकं केली. पण प्रत्यक्ष भेटी दरम्यान पाकिस्तानने खेळलेल्या या रडीच्या डावाकडून पाकिस्तानचं शेपूट कसं आणि किती वाकडंच आहे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा दिसून आलं.
या सर्व बाबींची सातत्याने चर्चा सुरू आहेच पण एक गोष्ट प्रत्येकाने मानायला हवी. जाधव कुटुंबातल्या या दोघींनी या संपूर्ण प्रकरणात दाखवलेला धीरोदात्तपणा. पोटच्या मुलाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय हे सहन करणा-या मातेची, पतीला फाशी होणार आहे या केवळ कल्पनेनेच त्या पत्नीची काय अवस्था होत असेल याची कल्पनाच केलेली बरी.
पाकिस्तानात जाऊन त्यांची भेट घेण्यावर या दोघींच्या मनावर किती दडपण असेल, भावनांचा कल्लोळ उठला असेल याची कल्पना करा... पण पाकिस्तानात पाऊल ठेवल्यापासून भेट होऊन बाहेर येईपर्यंत या दोन मातांच्या चेह-यावर स्थितप्रज्ञ भाव कायम होते.
भेटीआधी गाडीतून उतरल्यावर त्यांनी तिथल्या अधिका-यांना हात जोडून नमस्कार केला, पण मान लवली नाही. पुढे बैठक सुरू असतानाही त्याचा चेहरा शांत होता. बैठकीआधी पाकिस्तानने कपडे बदलायला लावले, मंगळसूत्र, कुंकू, बांगड्या काढायला लावल्या. मातृभाषेत संवाद साधायला मज्जाव केला, डेप्युटी हायकमिश्नरची दिशाभूल करून त्यांना बैठकीत उशीरा पाठवलं, कुलभूषण यांच्याशी बैठकीत काचेच्या पडद्याआड बसवलं, टेलिकॉम द्वारे संवाद साधायला लावला.
बैठकीनंतर पाकिस्तानने चपलाही चोरल्या. म्हणजे हरतऱ्हेने सायकॉलॉजिकल वॉर खेळण्याचा प्रयत्न केला. यात जाधव मातांचा प्याद्यासारखा वापर झाला. तरीही त्या दोघी शांत राहिल्या. त्यांनी चेहऱ्यावर संयम राखला. बाहेर आल्यावर पाकिस्तानी मीडियाने वाटेल ते प्रश्न विचारले. त्यांच्या मुलाला कातिल असं संबोधलं तरीही त्या शांत राहिल्या. चेहऱ्यावरची रेषाही ढळू दिली नाही... त्यांच्या या शांत, धीरोदात्त, संयमी वर्तनाने पाकिस्तानने हे सायकॉलॉजिकल वॉर हरलं.
आता पुन्हा आपण आपल्या मुलाला, पतीला भेटणार आहोत की नाही, ही 40 मिनिटांची बैठक अखेरची असेल का असे नाना तऱ्हेचे प्रश्न त्यांना पडले असतील. पण प्रत्यक्ष बैठक, तिथलं वर्तन हे एक युद्धच आहे असं समजून एखाद्या नाणावलेल्या लष्करप्रमुखासारख्या त्या वागल्या.
बैठकीचे फोटो प्रसिद्ध करून, पाकिस्तानी मी़डियाकरवी त्या दोघींना त्रास देण्याचा उद्योग पाकिस्तानने केला खरा पण त्यातून त्या दोघींचा संयमी वावरच जगासमोर आला आणि पाकिस्तानचं पुन्हा एकदा थोबाड फुटलं.