कुलभूषण जाधव प्रकरणी २१ फेब्रुवारी रोजी न्यायालयात सुनावणी
१८ ते २१ फेब्रुवारी रोजी द हेग येथील आंतराष्ट्रीय न्यायालयात खटल्याची सुनावणी होणार
नवी दिल्ली : कुलभषण जाधव यांना पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधात आंतराष्ट्रीय न्यायालयात उद्यापासून जाहीर सुनावणी सुरू होणार आहे. द हेग येथील आंतराष्ट्रीय न्यायालयात खटल्याची सुनावणी होणार आहे. १८ ते २१ फेब्रुवारी दरम्यान न्यायालयाच्या १० सदस्यीय पीठासमोर ही सुनावणी करण्यात येणार आहे. या खटल्याचे संकेत स्थळावर थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे. याप्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे १८ फेब्रुवारीला भारताची बाजू मांडणार आहेत. त्यानंतर १९ तारखेला खावर कुरेशी यांच्याकडून पाकिस्तानची बाजू मांडण्यात येणार आहे. २० तारखेला यावर भारताचा प्रतिवाद असेल तर शेवटच्या दिवशी पाकिस्तान आपलं अखेरचे निवेदन सादर करणार आहे.
हेरगिरी आणि घातपाती कृत्ये केल्याच्या आरोपावरून एप्रिल २०१७ ला कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेला भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले. कुलभूषण जाधव भारतीय नागरिक आहे. पाकीची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने जाधव यांचे ईराणहून अपहरण करत त्यांना अटक केली होती. भारताचा गुप्तहेर असल्याचे सांगत पाकिस्तान कोर्टाने त्यांना मृत्यूदंड ठोठावला होता.