...म्हणून त्याने पोलीस स्थानकातच केली चोरी
पोलिसांना अद्दल घडविण्यासाठी चक्क पोलीस स्थानकातच चोरी केल्याचे उघड झाले आहे.
पिहोवा : पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही तर तक्रारदार हैराण होऊन जातो. आता काय करावे हे त्याला सुचत नाही. पण एका तरुणाने पोलिसांना अद्दल घडविण्यासाठी चक्क पोलीस स्थानकातच चोरी केल्याचे उघड झाले आहे. कुलदिप सिंह असे त्या तरुणाचे नाव असून तो पिहोवा येथे राहतो.
पोलीस झोपले ?
कुलदिप याच्या गाडीची काच फोडून आतील सामान चोरी करण्यात आले होते. या घटनेची तक्रार नोंदविण्यासाठी शुक्रवारी दुपारी ११ वाजता पोलीस ठाण्यात गेला. पण पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नसल्याचे कुलदिप याने सांगितले. तसेच यावेळी पोलीस झोपले असल्याचेही त्याच्या निदर्शनास आले.
फाईल्स आणि गणवेश चोरला
त्रस्त झालेल्या कुलदिप सिंह याने शुक्रवारी रात्री पोलिस ठाण्यात ठेवलेल्या फाईल आणि कागदांसह गणवेशांची चोरी केली. पोलीस कर्मचारी यावेळी झोपले होते असा व्हिडिओही तयार केल्याचा दावा कुलदिप सिंह याने केला आहे.
अटक होणार
कुलदिप सिंह याने पत्रकार परिषद घेऊन झालेला प्रकार सर्वांना सांगितला. पोलीस स्थानकातील या चोरीनंतर पोलिसांनी आता या तरुणाच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप त्याला अटक झाली नसली तरी लवकरच अटक केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.