नशेत बंदुका हातात घेऊन नाचणारा भाजपचा नेता सोशल मीडियावर व्हायरल
आमदार महोद्य हातात एक-दोन नाही तर तीन रिव्हॉल्वर एक असॉल्ट रायफल घेऊन गाण्याच्या तालावर नाचताना दिसत आहेत
देहरादून : वादग्रस्त वक्तव्यांसाठी आणि बेजबाबदार वर्तनासाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे खानपूरचे आमदार कुंवर प्रणव सिंह चॅम्पियन पुन्हा एकदा चर्चेत आलेत. चॅम्पियन यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. रंगेल स्वभावाचे चॅम्पियन या व्हिडिओत बंदुकी हातात घेऊन नाचताना आणि वादग्रस्त भाषा वापरताना दिसत आहेत.
आमदार महोद्य हातात एक-दोन नाही तर तीन रिव्हॉल्वर एक असॉल्ट रायफल घेऊन गाण्याच्या तालावर नाचताना दिसत आहेत. या व्हिडिओत चॅम्पियन नशेत एक - एक बंदूक घेऊन ती दाखवताना दिसत आहेत.
'कठोर कारवाई होणार'
चॅम्पियन यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी अनिल बलूनी यांनी या प्रकरणी उत्तराखंडच्या वरिष्ठांशी चर्चा करून चौकशीनंतर यावर कडक कारवाई करण्याचे संकेत दिलेत.
पोलिसांकडून गुन्हा दाखल
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही हे प्रकरण गंभीरतेनं घेतलंय. हरिद्वारचे एसएसपी जन्मेजय प्रभाकर खंडुरी यांनी या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचं म्हटलंय. व्हिडिओमध्ये दिसणारे शस्त्रांना लायसन्स नसेल तर चॅम्पियन आणि त्यांच्यासोबत दिसणाऱ्या लोकांवर 'आर्म्स ऍक्ट'नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. हा व्हिडिओ कुठे आणि कधी बनवण्यात आलाय, त्याचीही चौकशी सुरू आहे.
पक्षातून तीन महिन्यांसाठी निलंबन
उल्लेखनीय म्हणजे, याआधीच भाजपनं अनुशासनाचं उल्लंघनाच्या आरोपाखाली कुंवर प्रणव सिंह यांना निलंबित केलंय. यापूर्वी जून महिन्यात त्यांचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये ते पत्रकारासोबत गैरव्यवहार करताना दिसले होते. या प्रकरणात पक्षानं कारवाई करत त्यांना तीन महिन्यांसाठी निलंबन केलंय.