Lalit Modi on Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मोदी आडनावावरुन (Modi Surname) केलेल्या टिप्पणीमुळे आपली खासदारकी गमवावी लागल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच आता राहुल गांधींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) राहुल गांधींना युकेमधील कोर्टात खेचण्याच्या तयारीत आहेत. ललित मोदी सध्या कथित आर्थिक घोटाळा प्रकरणी फरार आहे. ललित मोदी यांनी ट्वीट करत राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ललित मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून काँग्रेस आणि राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे. आपल्याला कोणत्याही आरोपात दोषी ठरवलेलं नसतानाही फरार म्हणून संबोधत असल्याने ललित मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. ललित मोदी यांनी एकामागोमाग अनेक ट्विट केले आहेत. जगातील सर्वात मोठ्या क्रिडा स्पर्धेमागे आपण असून त्यातून 100 बिलियन अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त कमाई झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 


ललित मोदी यांनी ट्विटरला आपल्या आजी-आजोबांचे फोटो शेअर केले आहेत. गांधी कुटुंबापेक्षाही आपल्या कुटुंबाने देशासाठी जास्त योगदान दिलं असल्याचं ते म्हणाले आहेत. 



"कोणताही टॉम, डिक आणि गांधींचा सहकारी वारंवार मी फरार असल्याचं म्हणत आहे. का? आणि कसं? मला यासाठी कधी दोषी ठरवण्यात आलं?," अशी विचारणा ललित मोदी यांनी केली आहे.



"आता सर्वसामान्यही राहुल गांधी उर्फ पप्पू म्हणत असून, विरोधकांना कोणतंही काम नाही किंवा त्यांच्याकडे चुकीची माहिती असून, द्वेष पसरवत असल्याचं दिसत आहे. मी आता राहुल गांधींना युकेमधील कोर्टात खेचण्याचं ठरवलं आहे. त्यांना आता ठोस पुरावा द्यावा लागणार आहे. आपली मुर्खात गणना करण्यासाठी मी त्यांची वाट पाहत आहे," असं ट्वीट ललित मोदींनी केलं आहे.


राहुल गांधी यांनी एका सभेत बोलताना सर्व चोरांचं आडनाव मोदी कसं काय? अशी विचारणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधताना राहुल गांधींनी नीरव मोदी आणि ललित मोदीचा उल्लेख केला होता. दरम्यान याप्रकरणी सूरत कोर्टाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली असून जामीनही दिला आहे. तर दुसरीकडे लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली आहे. या सर्व घडामोडींनंतर ललित मोदींनी हे ट्विट केले आहेत. दरम्यान आपण कोणताही घोटाळा केला नसून सर्व पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.