`सीबीआयच्या कारवाईपासून वाचण्यासाठी लालूंनी जेटलींकडे मदत मागितली होती`
तुम्ही सांगाल तसे वागायला मी तयार आहे.
पाटणा: राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांच्याकडे मदतीची याचना केली होती, असा गौप्यस्फोट बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी केला. ते बुधवारी पाटणा येथे प्रसारमाध्यमांसमोर बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, सीबीआयकडून चारा घोटाळ्याची चौकशी सुरु झाल्यानंतर लालू प्रसाद यादव भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांकडे मदतीची याचना करत होते. एवढेच नव्हे तर त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचीही भेट घेतली होती. तुम्ही मला सीबीआयच्या कारवाईपासून वाचवले तर मी बिहारमधील नितीश कुमारांचे सरकार पाडेन, असे लालूंनी जेटलींना म्हटले होते. तुम्ही सांगाल तसे वागायला मी तयार असल्याचेही लालूंनी जेटलींना सांगितले. मात्र, जेटली यांनी सीबीआयच्या कारवाईत हस्तक्षेप करायला नकार दिला होता, असा खुलासा सुशील कुमार मोदी यांनी केला.
सीबीआय सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर लालूंनी स्वत:ला वाचवण्यासाठी बरीच धडपड केली. त्यांनी प्रेम गुप्ता यांच्याकरवी अरूण जेटली यांच्याशी संपर्क साधला होता. यापूर्वीही अनेकदा लालूंनी भाजपची मदत घेतली होती. १९७४ साली झालेल्या जेपी आंदोलन आणि त्यानंतर १९७५ मध्ये लालूंनी संघ आणि भाजपच्या नेत्यांची मदत घेतली होती. एवढेच नव्हे तर छपरा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठीही लालूंनी संघ व भाजपकडे मदत मागितली होती, असे सुशील मोदी यांनी सांगितले.
सध्या कारागृहात असणारे लालू प्रसाद यादव यांनी आपल्या राजकीय प्रवासाविषयी पुस्तक लिहण्याचा संकल्पही सोडला आहे. विद्यार्थिदशेपासूनचा आपला राजकीय प्रवास आणि १९७४ मधील जयप्रकाश यांचे आंदोलन या संदर्भातील रंजक गोष्टींचा पुस्तकात समावेश असेल, असे लालूंनी कार्यकर्त्यांना सांगितले होते. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीनंतर लालू प्रसाद यादव पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात करणार आहेत.