लालूप्रसाद यादवांच्या मोठ्या बहिणीचं निधन, भावाला शिक्षा झाल्याने बसला होता धक्का
चारा घोटाळा प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्यासाठी आता आणखीन एक वाईट बातमी समोर आली आहे.
नवी दिल्ली : चारा घोटाळा प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्यासाठी आता आणखीन एक वाईट बातमी समोर आली आहे.
चारा घोटाळा प्रकरणी लालूप्रसाद यादव यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या मोठ्या बहिणीचं निधन झालं आहे.
लालूप्रसाद यादव यांची मोठी बहिण गंगोत्री देवी या पाटनामधील वेटनरी कॉलेज सर्व्हंट क्वार्टरमध्ये राहत होती. माझ्या भावाला पैसेवाल्यांनी अडकवलं असल्याचं गंगोत्री देवी म्हणत असल्याचं त्यांच्या मुलाने सांगितलं.
गंगोत्री देवींच्या घरातून चालत असे मुख्यमंत्र्यांचं ऑफिस
असं म्हटलं जातं की, लहान भाऊ लालूप्रसाद यादव यांच्यावर गंगोत्री देवी यांचं खूपच प्रेम होतं. सहा भावांना गंगोत्री देवी ही एकच बहीण होती. त्या वेटनरी कॉलेज सर्व्हंट क्वार्टरमध्ये राहत होत्या. लालूप्रसाद यादव मुख्यमंत्री झाल्यानंतर १९९० मध्ये जवळपास सहा महिने याच ठिकाणाहून त्यांनी सरकार चालवलं होतं.
चारा घोटाळा प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीप्रमुख लालूप्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने साडे तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच ५ लाखांचा दंडही ठोठावला आहे.