पाटणा : पत्नी ऐश्वर्या राय हिच्यासोबत घटसफोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव यांनी शनिवारी मीडियाशी संवाद साधला. वृत्तसंस्था एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, आपल्या घटस्फोटासंदर्भातील बातम्या खऱ्या असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. 'घटस्फोटासाठी मी कोर्टात अर्ज दाखल केलाय. मी तळमळत जगत होतो, असं जगण्याचा काहीही फायदा नाही', अशी प्रतिक्रिया तेजप्रताप यादव यांनी मीडियाशी बोलताना दिलीय.


कोर्टात अर्ज मंजूर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, कोर्टानं तेजप्रताप यादव यांचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केलाय. या अर्जाचा केस नंबर १२०८ असा आहे. कोर्टानं सुनावणीसाठी २९ नोव्हेंबरची तारीख दिलीय.



 


लालूंची तब्येत बिघडली


तेजप्रताप यांचा पत्नीला घटस्फोट देण्याच्या निर्णयानं लालूंना मात्र मोठा धक्का बसलाय. चारा घोटाळ्यातील दोषी आणि आरजेडी सुप्रीमो लालू सध्या 'रिम्स'मध्ये पेइंग वार्डमध्ये भर्ती आहेत. मुलाच्या घटस्फोटाच्या बातम्या कानी आल्यानंतर लालू यांचा रक्तदाब आणि रक्तातील शर्करेचं प्रमाण वाढल्याचं समजतंय.


फाईल फोटो

 


तेजप्रताप घेणार वडिलांची भेट


आज तेजप्रताप यादव पिता लालू यादव यांची भेट घेण्यासाठी रांचीहून निघालेत. 'रिम्स'मध्ये आज दोघांची बेट होऊ शकते. नियमानुसार, लालू केवळ तीन जणांची भेट घेऊ शकतात. त्यांची नावं लालू ठरवू शकतात. 


काल घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर तेजप्रताप वडिलांना भेटण्यासाठी रांचीला रवाना झाले होते... परंतु, कुटुंबाकडून सातत्यानं फोन आल्यानंतर त्यांनी रांचीला जाणं रद्द केलं होतं. हा अर्ज दाखल केल्यानंतर त्यांची पत्नी ऐश्वर्या, सासरे चंद्रिका राय आणि ऐश्वर्याची आई हे राबडी देवीच्या (तेजप्रताप यांची आई) घरी रात्री ११ वाजेपर्यंत चर्चा करत होते.


तेजप्रताप-चंद्रिका यांच्या नात्यात तणाव


तेजप्रताप आणि ऐश्वर्या गेल्या चार महिन्यांपासून एकत्र राहत नसल्याचं वृत्त काल प्रसिद्ध झालं होतं. लालुंचा मोठा मुलगा तेजप्रताप आणि चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या यांचं पाच महिन्यांपूर्वी १२ मे रोजी पाटण्यात लग्न झालं होतं. या लग्नासाठी लालूंना पॅरोल देखील देण्यात आला होता.