Kerala Wayanad Landslide : केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळ मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेत 400 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली दबले असून, 60 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. तर 70 लोक जखमी झाले आहेत. वैद्यकीय पथकांसह 225 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केरळच्या वायनाड जिल्ह्यातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने तीन मुलांसह 41 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी पहाटे मेपाडीजवळ ही घटना घडली. 



मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 2 वाजता या भागात पहिला भूस्खलन झालं. त्यानंतर, पहाटे 4.10 च्या सुमारास जिल्ह्यात आणखी एक भूस्खलन झाला. मुंडक्काई, चुरलमाला, अट्टामला आणि नूलपुझा गावांना भूस्खलनाचा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पंतप्रधान कार्यालयाने भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. जखमींना 50,000 रुपये मिळणार आहेत.



अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या तुकड्या बाधित भागात तैनात करण्यात आल्या आहेत, अतिरिक्त NDRF टीम वायनाडला जात आहे, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने दिलीय. 



वृत्तसंस्था एएनआयने सांगितले की, हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर, एक एमआय-17 आणि एक एएलएच, बचाव कार्यासाठी सुलूरमधून रवाना झाले आहेत. किमान 50 लोक मेपाडीमधील रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली आहे. 



वेस्ट कोस्ट वेदरमनने X वर शेअर केलेल्या कथित व्हिडीओमध्ये जिल्ह्यातील भूस्खलनाचे ठिकाण दाखवलंय. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (KSDMA) च्या फेसबुक पोस्टनुसार, कन्नूर डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सच्या दोन पथकांना बचाव कार्यात मदत करण्यासाठी वायनाडला जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संततधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. 



दरम्यान एका निवेदनात केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले आहे की, 'वायनाडमधील भूस्खलनावर सर्व संभाव्य बचाव कार्यात समन्वय साधला जाईल. आम्हाला घटनेची माहिती मिळाल्यापासून सरकारी यंत्रणा बचाव कार्यात सहभागी झाल्या आहेत. मंत्री वायनाडला भेट देतील आणि उपक्रमांचे नेतृत्व करतील.'



राहुल गांधी यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला


वायनाडचे माजी खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, 'वायनाडमधील मेप्पडीजवळ झालेल्या भूस्खलनाने मला खूप दु:ख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या शोकसंतप्त कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. मला आशा आहे की जे अजूनही अडकले आहेत त्यांची लवकरच सुखरूप सुटका होईल.'



दरम्यान, दरड कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला. आपत्कालीन मदतीसाठी 9656938689 आणि 8086010833 हे हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत.