गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे २८ हजारहून अधिक रुग्ण वाढले
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 8 लाख 78 हजार 254 इतकी झाली आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोना रुग्ण संख्येत तब्बल 29 हजार जवळपास वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे 25 हजारहून अधिक रुग्ण दररोज वाढत आहेत. कोरोना संसर्गाचा वाढता वेग अतिशय चिंताजनक असून भारतातील कोरोना रूग्णांची आकडेवारी 9 लाखांजवळ पोहचली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात, 28 हजार 701 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर एका दिवसात 500 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 8 लाख 78 हजार 254 इतकी झाली आहे.
यापैकी 3 लाख 1 हजार 609 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर 5 लाख 53 हजार 471 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 23 हजार 174 जण दगावले आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने ICMR दिलेल्या माहितीनुसार, 12 जुलैपर्यंत 1,18,06,256 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
अखेर या देशात कोरोना लसीची मानवी चाचणीही यशस्वी
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत जगभरात 2 लाख 30 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधित देशांमध्ये अमेरिका पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. गेल्या चोवीस तासात अमेरिकेत 66 हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत.