दिलासा! गेल्या 24 तासात देशात सर्वाधिक 51 हजारहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एका दिवसातील ही सर्वाधिक आकडेवारी आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची आकडेवारी सतत वाढते आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात रोज 50 हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना, दुसरीकडे कोरोनाग्रस्त बरे होण्याचं प्रमाणही वाढत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात गेल्या 24 तासात सर्वाधिक 51 हजार 255 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एका दिवसातील ही सर्वाधिक आकडेवारी आहे.
देशात आतापर्यंत 11 लाख 45 हजार 629 कोरोना रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 65.44 टक्के इतकं झालं आहे. देशातील रिकव्हरी आणि डेथ रेशियो 96.84 टक्के : 3.16 टक्के इतका झाला आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने (ICMR) दिलेल्या माहितीनुसार, देशात 1 ऑगस्टपर्यंत 1,98,21,831 इतक्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, गेल्या 24 तासांत देशात 54 हजार 736 नवे रुग्ण आढळले आहेत. तर एका दिवसात 853 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 17 लाख 50 हजार 724 इतकी झाली आहे. सध्या 5 लाख 67 हजार 730 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर 37 हजार 364 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
भारतात एका दिवसात ५४ हजारहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची वाढ