श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपिया भागात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळतेय. या एन्काऊन्टरमध्ये सेनेचा एक जवान गंभीर जखमी झाल्याचंही समजतंय. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षादलांनी या चकमकीत बुरहान वानी ग्रुपचा शेवटचा कमांडर लतीफ टायगरसहीत तारिक मौलवी यालाही ठार केलंय. परंतु, अद्याप याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २००५ साली हिजबुल मुजाहिद्दीन कमांडर बुरहान वानीसोबत दहशतवाद्यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यातील एक तारिक पंडित याला २०१६ मध्ये जिवंत पकडण्यात आलं होतं. लतीफ टायगरच्या खात्म्यासोबत सुरक्षादलांनी या सर्व दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळवलंय.


दोन - तीन दहशतवादी लपून बसल्याची सुरक्षा दलांना सूचना मिळाल्यानंतर, ३४ - आरआर आणि एसओजी शोपियानं इमाम साहिब भागात संलग्न ऑपरेशन सुरू केलं. सुरक्षादलांनी संपूर्ण भागाला वेढा घातला. दोन्ही बाजुंना गोळीबार सुरू झाला आणि त्यात लतीफ टायगर ठार झाला. 



एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमध्ये शोपिया जिल्ह्यातील इमाम साहिब भागात सुरक्षा दलांनी शुक्रवारी वेढा घालून शोध अभियान सुरू केलं होतं. 


उल्लेखनीय म्हणजे, सोमवारी ६ मे रोजी याच भागात लोकसभा निडवणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेला बाधा पोहचवण्याच्या दहशतवाद्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.