वर्धा: गेल्या निवडणुकीत तुम्ही मोदींवर विश्वास दाखवला. साडेचार वर्षात मोदींना ट्राय केलंत, मात्र हा प्रयोग फसला. त्यांची गाडी पंक्चर झाल्यामुळे चाललीच नाही. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत काँग्रेस आणि महात्मा गांधीजींच्या विचारधारेवर विश्वास दाखवा, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. ते मंगळवारी वर्धा येथील जाहीर सभेत बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, रोजगार, बँकांची बुडीत कर्जे आणि राफेल विमान खरेदी व्यवहार आदी मुद्द्यांवरून मोदी सरकारवर चौफेर टीका केली. यावेळी राहुल गांधी यांनी म्हटले की, मी पंतप्रधान होण्यापूर्वी भारतात काहीच घडले नव्हते, देशाचा विकासच झाला नव्हता, अशा थाटात नरेंद्र मोदी नेहमी बोलत असतात. मात्र, गेल्या साडेचार वर्षात त्यांनी काळा पैसा भारतात आणण्यापासून ते रोजगारापर्यंत दिलेले प्रत्येक आश्वासन आणि दावा खोटा ठरला आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. 


यावेळी राहुल गांधींनी पुन्हा एकदा निश्चलनीकरण आणि राफेल विमान खरेदी व्यवहाराच्या मुद्द्यावरून भाजपाचा समाचार घेतला. नोटबंदीचा निर्णय हा उद्योगपतींचा काळा पैसा पांढरा करु देण्यासाठी होता. तसेच गेल्या चार वर्षांत मोदींनी देशातील १५ ते २० उद्योगपतींचे मिळून ३ लाख २० हजार कोटींचे कर्ज माफ केले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची वेळ येते तेव्हा सरकारकडून हे आमच्या धोरणात बसत नाही, असे सांगितले जाते, अशी टीका राहुल यांनी केली.