Weather Alert : पुढचे 48 तास महत्त्वाचे; हवामान बदलामुळं थंडी वाढणार, पावसाचा तडाखाही बसणार
Weather Update : देशात हवामान सातत्यानं बदलत असून गेल्या काही दिवसांपासून थंडीचा मुक्काम वाढल्याचं लक्षात येत आहे. इथं मुंबईसुद्धा गारठली आहे. त्यातच म्हणे आता पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Weather Update : देशाच्या (Northern India) उत्तरेकडे सातत्यानं सुरु असणाऱ्या थंडीच्या लाटेचे थेट परिणाम महाराष्ट्र (Maharashtra Winter), इतकंच नव्हे तर दक्षिण भारतापर्यंत (South India) दिसू लागले आहेत. उत्तर भारतात सक्रीय असणाऱ्या या लाटेमुळं हवामानात मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळत आहेत. कुठे तापमानात एकाएकी वाढ झाली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार प्रचंड पाऊस आणि बर्फवृष्टीचे हे संकेत आहेत.
देशाच्या पर्वतीय भागांमध्ये तुफान बर्फवृष्टी
काश्मीर (Kashmir) आणि लडाखमधील (Ladakh) पर्वतीय भागांमध्ये सातत्यानं तापमान कमी होत असून, हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदानुसार या प्रदेशाच्या मैदानी भागात हिमवृष्टी (snowfall) आणि काही भागांमध्ये पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. 25 जानेवारीपर्यंत अशीच परिस्थिती कायम असेल. सलग होणाऱ्या या बर्फवृष्टीमुळं काश्मीरमधील काही महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतुक कोंडीची समस्या भेडसावू शकते. शिवाय हवाई वाहतुकीवरही याचे थेट परिणाम होणार आहेत. थोडक्यात या भागात रक्त गोठवणाऱ्या थंडीचा कहर पुन्हा पाहायला मिळेल.
हेसुद्धा वाचा : Bank Holidays in February 2023: फेब्रुवारी महिन्यात इतक्या दिवशी बॅंका बंद राहणार, जाणून घ्या
हिमाचल प्रदेशामध्ये (Himachal Pradesh) वेस्टर्न डिस्टर्बन्स पुन्हा एकदा सक्रीय झाल्यामुळं मैदानी भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढचे 48 तास इथं सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, प्रचंड हिमवृष्टी होणार असल्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अगदी (Republic Day) प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारीलासुद्धा देशभरात थंडीचा कडाका कायम असेल. तापमान किमान मर्यादेहूनही कमी झालेलं असताना अशा परिस्थितीत पावसाचा शिडकावा झाल्यामुळं गारठा वाढू शकतो.
मुंबईसुद्धा गारठली
मुंबईमध्ये सोमवारपासूनच थंडीनं पुन्हा जोर धरल्याचं पाहायला मिळालं. दिवसा सूर्यप्रकाश असतानाही शहरामध्ये नागरिकांना बोचऱ्या वाऱ्याचा सामना करावा लागला होता. मंगळवारीसुद्धा असंच काहीसं वातावरण शहरातील नागरिकांना अनुभवता येईल. तर, पुढील दोन दिवस तापमानात घट नोंदवण्यात येईल अशा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे.
पर्यटकांसाठी हवामान खात्यानं दिलाय इशारा
सध्याचा काळ पाहता अनेकांचाच कल हिमाचल, काश्मीर (Kashmir) आणि उत्तराखंडकडे दिसून येतो. पण, हवामानाची स्थिती पाहता पर्यटकांनी अधिक उंचीच्या ठिकाणांवर जाऊ नये. शिवाय रस्ते मार्गानं प्रवास करतानाही काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळं तुम्हीसुद्धा पर्यटनाच्या दृष्टीनं या भागांमध्ये जाण्याच्या विचारात असाल तर एकदा Weather Update पाहूनच घ्या.