नवी दिल्ली: देशभरात विधी अभ्यासक्रमासाठी नावाजल्या जाणाऱ्या दिल्लीतील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतील विद्यार्थिनीने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडून सुवर्णपदक स्वीकारण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला होता. मात्र, नियोजित प्रक्रियेचे उल्लंघन करून हे प्रकरण हाताळण्यात आले. त्याचा निषेध करण्यासाठी सुरभी करवा या विद्यार्थिनीने सरन्यायाधीश गोगोई यांच्या हस्ते सत्कार करून घ्यायला नकार दिला. 


सुरभी करवा ही नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या एलएलएम अभ्यासक्रमात पहिली आली होती. त्यामुळे तिचा सुवर्णपदक देऊन सत्कार करण्यात येणार होता. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे सुरभीने या समारंभाला उपस्थित राहायचे टाळले.


'द इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी दैनिकाने याविषयी तिला विचारणा केली असता तिने आपली भूमिका स्पष्ट केली. मी आजपर्यंत वर्गामध्ये जे काही शिकले आहे त्यामुळे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडून पुरस्कार स्वीकारावा की नाही, याबाबत माझ्या मनात नैतिक गोंधळ सुरु होता. जेव्हा न्यायव्यवस्थेच्या प्रमुखांविरुद्ध लैंगिक छळाचे आरोप झाले तेव्हा ते नियमांचे पालन करण्यात अपयशी ठरले. संविधानाचे रक्षण करण्यात वकिलांची भूमिका काय असावी, याचे उत्तर सध्या मी शोधत आहे. सरन्यायाधीशांनीही आपल्या भाषणात नेमकी हीच गोष्ट नमूद केली, असे सुरभी करवा हिने म्हटले. 


याच कारणामुळे आपण सरन्यायाधीशांकडून पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. मात्र, माझा पुरस्कार स्वीकारण्यास विरोध नाही, असेही तिने स्पष्ट केले. सुरभी करवा हिने मास्टर्स डिग्रीसाठी संविधानिक कायदा हा विषय निवडला होता. 


सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयातील एका महिला कर्मचाऱ्याने लैंगिक छळाचा आरोप केला होता. आपण रंजन गोगोई यांना विरोध केल्यानंतर त्यांनी माझी बदली केली. यानंतर प्रशासकीय चौकशी करून मला कामावरून काढून टाकण्यात आले, असे संबंधित महिलेने प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. 


या प्रकरणामुळे देशभरात मोठी खळबळ माजली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती नेमण्यात आली होती. मात्र, रंजन गोगोई आणि सर्वोच्च न्यायालयाने विशाखा गाईडलाइन्सचे उल्लंघन केल्याने वाद निर्माण झाला होता.