CJI Dhananjay Chandrachud : देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे नेहमीच त्यांच्या रोखठोक विधानांसाठी प्रसिद्ध आहेत. सरन्यायाधीश चंद्रचूड सुप्रीम कोर्टातल्या शिस्तीला खूप महत्त्व देतात. त्यामुळेच कुणी ती शिस्त मोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला  सर्वासमोरच फटकारतात. अनेकदा त्यांनी शिस्तभंग करणाऱ्या वकिलांना थेट कोर्टरुम बाहेर काढण्याचा आदेश देतात. अशाच एका शिस्तभंग करणाऱ्या वकिलाला सरन्यायाधीशांनी पुन्हा एकदा सुनावलं आहे. हा काही रेल्वे प्लॅटफॉर्म नाही की कोणतीही ट्रेन आली की त्यात चढायला, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी सुप्रीम कोर्टात एक आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळाले, ज्यावेळई सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड एका वकिलावर चिडले होते. नेहमी प्रमाणे सोमवारी सुप्रीम कोर्टात एकामागून एक खटल्याची सुनावणी सुरू होती. पण अचानक दुपारी 12 वाजता एक तरुण वकील उभा राहिला आणि म्हणाला की त्याने न्यायालयीन सुधारणांसाठी एक जनहित याचिका दाखल केली आहे, ज्याची लवकरात लवकर सुनावणी घ्यावी. आपल्या याचिकेचा उल्लेख करताना वकीलाने, मी न्यायव्यवस्थेच्या विरोधात नाही, असं म्हटलं. त्यावेळी सरन्यायाधिशांनी संतापून वकिलाला वागणुकीबाबत महत्त्वाचा सल्ला दिला.


न्यायव्यवस्थेतील सुधारणांशी संबंधित एका याचिकेचा उल्लेख करताच ही याचिका बोर्डावर आहे का? आपण दुपारी 12 वाजता हे कसे नमूद करू शकता? असे सरन्यायाधिशांनी म्हटलं. यानंतर वकिलाने पुन्हा उत्तर दिले की, मी म्हटल्याप्रमाणे मी न्यायपालिकेच्या विरोधात नाही. यावर सरन्यायाधीश भडकले आणि त्यांनी हा मुद्दा नाही. पण तुम्ही असा उल्लेख कसा करू शकता? तुम्ही सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करता का? तुम्ही उभे राहून उल्लेख केलात. आम्ही दंड आकारू जो एससीबीएला भरावा लागेल, असे म्हटलं. यावर वकिलाने पुन्हा स्वतःचा बचाव करत मी न्यायपालिकेच्या विरोधात नसल्याचे म्हटलं. मी दिल्ली उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतो, असे वकिलाने म्हटलं. त्यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पुन्हा विचारले, "मग तुम्ही तिथे उभे राहून दिल्ली उच्च न्यायालयातील याचिकेचा उल्लेख कसा करता?"


वकिलाच्या या वृत्तीवर सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. 'हे असे प्लॅटफॉर्म नाही की तुम्ही कोणतीही ट्रेन येईल त्यात चढू शकता. याचिका कशी दाखल केली जाते याबाबत कृपा करुन आपल्या वरिष्ठांशी चर्चा करा,' असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.