पुणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांसारखी चिकाटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हवी, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. ते गुरुवारी पिंपरी-चिंचवड येथील कार्यक्रमात बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी शरद पवार यांनी एक उदाहरण दिले. मी भाजपच्या एका जेष्ठ नेत्याशी बोलत होतो. या नेत्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी फारशी पसंत नाही. मात्र, तरीही तुम्ही प्रचारात संघाच्या कार्यकर्त्यांना का सामील करून घेता, असा सवाल मी त्यांना विचारला होता. त्यावेळी त्या भाजप नेत्याने म्हटले की, संघाचे कार्यकर्ते हे अत्यंत प्रामाणिकपणे प्रचार करतात. समजा, ते पाच घरांमध्ये भेटायला गेले. त्यातील एखादे घर बंद असेल. तर, ते संध्याकाळी पुन्हा त्या घरी जातात. संध्याकाळी बंद असेल, तर सकाळी पुन्हा जातात. पण त्या घरी जाऊनच येतात. चिकाटी सोडत नाहीत.


राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही याचेच अनुकरण करत जनतेपर्यंत पोहोचायला हवे. जनतेच्या समस्यांवर आवाज उठवला पाहिजे. घराघरात जाऊन लोकांशी संवाद साधला पाहिजे. संघाप्रमाणे प्रचाराची यंत्रणा उभारली पाहिजे. त्यासाठी तन मन अर्पण करून काम केले पाहिजे. तेव्हाच मोठे यश मिळवणे शक्य आहे. संघ आणि भाजपच्या याच रणनीतीमुळे आज देशभरात कमळ उमलले आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले. 


तसेच लोकसभेतील अपयशामुळे खचून जाऊ नका, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. विधानसभा निवडणुकीत मतदार मोदी यांना बघून नाही, तर आपल्यासाठी काम करणाऱ्याकडे पाहून मतदान करतो. लोकसभेत घडलेले विधानसभेला घडत नाही. विधानसभेसाठी मतदार वेगळा विचार करतात, ही बाब लक्षात घ्या, असेही पवारांनी सांगितले.