`हा` आहे भारतातील सर्वात भयावह रोड! पाण्याची बाटली अर्पण करुनच पुढे जायचं; थरकाप उडवणारा घटनाक्रम
Travel News : पाण्याच्या बाटल्या, जीवघेणी वळणं आणि... लेह- मनाली मार्गावर `या` रहस्यमयी ठिकाणी पोहोचताच उडतो थरकाप. काय आहे या ठिकाणाचं रहस्य? जाणून घ्या
Travel News : फिरस्त्यांच्या अर्थात पर्यटनाची आवड असणाऱ्या अनेकांच्या यादीमध्ये काही ठिकाणांचा उल्लेख हमखास असतो. अशाच काही ठिकाणांच्या यादीमध्ये हिमाचल प्रदेश, लेह लडाखचा उल्लेख अग्रस्थानावर पाहायला मिळतो. तुम्ही कधी या ठिकाणांना भेट दिली आहे का? दिली असेल तर उत्तम आणि नसेल दिली तर या कमाल ठिकाणांविषयीची एक अतिशय रंजक माहिती पाहूनच घ्या. कारण, बाईकर्स असो किंवा मग रोड ट्रीपचं वेड असणारी मंडळी, साऱ्यांमध्येच या वाटेबाबत कमालीचं प्रेम आहे. अनेकांसाठी ही रहस्यमयी वाट म्हणजे एक मोठं रहस्य आहे तर, काहींसाठी एक अद्वितीय थरार.
कुठे आहे ही रहस्यमयी वाट...?
लेहच्या (Leh) वाटेवरून मनालीच्या (Manali) दिशेनं येताना निघालं असता थरकाप उडवणाऱ्या या रस्त्याचं नाव आहे गाटा लूप्स. अतीप्रचंड वळणांमुळं हा रस्ता संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय आहे. गाटा लूप्स वाटेवर केसातील U पिन प्रमाणं अनेक वळणं आहेत. साधारण 17 हजार फुटांच्या उंचीवर असणाऱ्या या रस्त्यावर 21 तीव्र वळणं आहेत. प्रत्येक वळणात असणारं अंतर 300 ते 600 मीटर असल्याचं सांगण्यात येत आहे.
सध्याच्या घडीला पर्यायी मार्गांची उपलब्धता अधिक असल्यामुळं अनेक वाहनं या पर्यायी मार्गाचाच वापर प्रवासासाठी करतात. पण, आजही काही वाहनं या गाटा लूप्सनं (Gata Loops) प्रवासाचा पुढचा पल्ला गाठतात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये या भागाशी जगाचा संपर्क पूर्णपणे तुटतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजही हा रस्ता तेथील थरारक वळणांसोबतच तिथं असणाऱ्या रहस्यांमुळं अनेकांचं कुतूहल जागवतो.
चर्चा अशी असते की...
स्थानिकांच्या सांगण्यानुसार आणि माध्यमांमध्येही प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार 1999 मध्ये एका ट्रकमध्ये या रस्त्यावरील 19 व्या वळणावर बिघाड झाला होता. अनेक प्रयत्न करूनही ट्रक चालक आणि क्लिनर तो दुरुस्त करू शकले नाहीत. याचदरम्यान बर्फवृष्टीमुळं इथं पुढची वाटही बंद झाली आणि त्या दोघांनाही कोणाचीच मदत मिळाली नाही.
मदतीसाठी ट्रक चालकानं नजीकच्या गावात जाण्याचा निर्णय घेतला, तिथं त्याच्या मदतनीसाची प्रकृती बिघडली. जोपर्यंत चालक गावकऱ्यांना घेऊन ट्रकपाशी आला होता तेव्हा भूक आणि तहानेनं त्याच्या मदतनीसाचा मृत्यू झाल्याचं त्यानं पाहिलं. ज्यानंतर तिथंच त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आले आणि तिथं त्याच्यासाठी एक लहानशी मंदिर/ घरवजा वास्तू बांधण्यात आली.
स्थानिकांच्या कहाण्यांमध्ये गाटा लूप्समध्ये अडकललेल्या त्या ट्रकची आणि त्याच्या चालकाची, मदतनीसाची गोष्ट कायम येते. इतकंच नव्हे, तर त्या मदतनीसासाठी आजही इथून जाणारे अनेक प्रवासी तिथं पाण्याच्या बाटल्या, खाण्याच्या वस्तू त्याच्यासाठी सोडून पुढच्या प्रवासाला निघतात. ही वाट प्रत्येकालाच पुढच्या टप्प्यावर नेते खरी, पण तिची रहस्य मात्र आजही तितकीच गूढ आहेत हे मात्र नाकारता येत नाही.