मध्य प्रदेशातील शहडोल परिसरातील दक्षिण वनविभाग परिक्षेत्रात रविवारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले. शहडोल रेंजमधील खिटौली बीटमध्ये सोन नदीजवळ काही लोक पिकनिक करत असताना ही घटना घडली. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटनास्थळी उपस्थितांपैकी एकाने हा 30 सेकंदाचा व्हिडीओ शूट केला आहे. व्हिडीओत बिबट्याला त्याचा चवताळण्यास भाग पाडणाऱ्यांवर हल्ला करताना दिसत आहे. बिबट्याने हल्ला केल्यानंतर घटनास्थळी एकच धावपळ आणि गोंधळ उडाला होता. 


व्हिडीओच्या सुरुवातीला काहीजण जोरजोरात ओरडताना दिसत आहेत. यावेळी ते झाडीत लपलेल्या बिबट्याला विनाकारण चेतवत होते. व्हिडीओत ते बिबट्याला पाहून 'ये ये (come come)' असं ओरडत असल्याचं ऐकू येत आहे. पण सुरुवातीला त्यांना वाटणारी मस्करी नंतर भयंकर सत्यात उतरली. काही वेळातच बिबट्या झाडीतून बाहेर आला आणि समोर उभ्या गर्दीच्या दिशेने धावत सुटला. 



बिबट्या धावत येताना पाहून तिथे उपस्थित तरुण धावू लागतात. यानंतर बिबट्या दोघांवर हल्ला करतो आणि एकाला खाली जमिनीवर पाडतो. हा सगळा प्रकार पाहून आधी मस्करी करणारे नंतर घाबरले आणि पळा असं ओरडू लागले. व्हिडीओत हेदेखील कैद झालं आहे. दरम्यान काही वेळाने बिबट्या तेथून पळून जातो. 


उपविभागीय वन अधिकारी बादशाह रावत यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी या भागात वाघाच्या हल्ल्याची आणखी एक घटना घडली होती. त्यानंतर त्यांनी लोकांना जंगलात न जाण्याचा सल्ला दिला होता. "ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. आम्ही अधिकाऱ्यांना गावकऱ्यांना आणि इतर लोकांना जंगलात न जाण्याची सूचना देण्यास सांगितले आहे. अशा घटनांमध्ये लोकांना मदत करण्यासाठी एक नियंत्रण कक्ष देखील स्थापन करण्यात आला आहे," अशी माहिती त्यांनी दिली.