मुंबई: अर्थव्यवस्थेत मरगळ आल्यामुळे रोजगाराच्या संधी घटत असतानाच आता भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) प्रचंड मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. 'एलआयसी'कडून लवकरच 'असिस्टंट क्लार्क' या पदासाठी मेगा भरती करण्यात येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून एलआयसीच्या देशभरातील विविध कार्यालयांमधील तब्बल आठ हजार जागा भरण्यात येतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एलआयसी'कडून २४ वर्षांनंतर पदभरती केली जात असून, या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  त्यानुसार, 'असिस्टंट क्लार्क' पदासाठी पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा घेतली जाईल. यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक असून त्याचे वय १८ ते ३० दरम्यान असावे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट शिथील करण्यात आली आहे. 


पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे परीक्षेचे स्वरुप असेल. पूर्व परीक्षेसाठी रिझनिंग अॅबिलिटी, न्यूमेरिकल अॅबिलिटी आणि इंग्रजी हे तीन विषय असून, ही परीक्षा ऑनलाइन होणार आहे. बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे असे परीक्षेचे स्वरूप असेल. 


या परीक्षेसाठी संपूर्ण देशात परीक्षा केंद्रे असून, महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, पणजी आदी ठिकाणी परीक्षा होणार आहे. त्यासाठी इच्छुकांना १ ऑक्टोबर २०१९ पर्यंत www.licindia.in/careers या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.