नवी दिल्ली : लष्करप्रमुख आता मराठमोळे लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे होण्याची शक्यता आहे. ते 31 डिसेंबरला पद भार स्वीकारण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. 31 डिसेंबरला बिपीन रावत यांचा लष्करप्रमुख पदाचा कार्यकाळ संपतो आहे. गेले सहा महिने ते व्हॉईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून काम पाहत आहेत. विशेष म्हणजे बिपीन रावत हे देशाचे पहिले चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यामुळे लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांच्यावर देशाच्या सामरिक व्यवस्थापनात सर्वोच्च स्तरावर होणाऱ्या महत्वाच्या बदलांची अंमलबजावणी करण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लेफ्टनेंट जनरल मनोज नरवणे यांनी जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्स बटालियन आणि इन्फेंट्री ब्रिगेडची जबाबदारी याआधी निभावली आहे. ते श्रीलंकेमध्ये इंडियन पीस कीपिंग फोर्सचे देखील सदस्य होते. 3 वर्ष ते म्यांमारमध्ये देखील होते. लेफ्टनेंट जनरल नरवणे एनडीए आणि आयएमए मधून शिकले आहेत.


लेफ्टनेंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना आव्हानात्मक भागांमध्ये काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यांना सेना पदक ही मिळालं आहे. नागालँडमध्ये महानिरीक्षक असम राइफल्स (उत्तर) रूपात सेवा बजावल्यामुळे त्यांना 'विशेष सेवा पदक' आणि  'अति विशेष सेवा पदक' देखील मिळालं आहे.