Lion Standing On Sea Coast: जंगलात कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. मात्र जंगलाचा राजा तुम्हाला समुद्रकिनाऱ्यावर पाहायला मिळाला तर? आता तुम्ही म्हणाल की जंगलाचा राजा असणारा सिंह समुद्रावर कशासाठी जाईल? पण खरोखरच जंगलाचा राजा समुद्रकिनारी फेरफटका मारतानाचा फोटो कॅमेरात कैद झाला असून सध्या तो चर्चेचा विषय ठरतोय. विशेष म्हणजे हा फोटो भारतामधील असल्याने फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नक्की घडलंय काय जाणून घेऊयात...


पिक्चर परफेक्ट फ्रेम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नजर जाईल तिथपर्यंत समुद्र, समुद्राचं पाणी आणि आकाश या दोघांमध्ये फरक दाखवणारं क्षितीज अन् समुद्रकिनाऱ्यावर धडकणाऱ्या फेसाळणाऱ्या लाटा... एखाद्या चित्रपटातील रोमॅण्टीक दृष्य वाटावं असा हा नजरा आहे गुजरातमधील. पण यामध्ये एक थ्रीलर ट्वीस्ट आहे. तो म्हणजे या साऱ्या पिक्चर परफेक्ट फ्रेमच्या मध्यभागी असलेला जंगलाचा राजा सिंह! बरं हा सिंह साधासुधा नाही तर आशियाई सिंह आहे.


नेमका कुठला आहे फोटो?


गुजरातमधील जुनागढ येथील समुद्रकिनाऱ्यावर काढण्यात आलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा सिंह समुद्रकिनाऱ्यावर उभा राहून समुद्राच्या लाटांचा आनंद घेताना दिसत आहे. जुनागढमधील मुख्य वनसंरक्षकांनी आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. "भद्रावा पुनम पेट्रोलिंगदरम्यान दर्या काठ परिसरामध्ये सिंह आढळून आला," अशी कॅप्शनसहीत हा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो सध्या जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरतोय.



काहींनी केली नार्नियाशी तुलना


यानंतर भारतीय वन सेवा अधिकारी पवन खासवान यांनीही हा फोटो शेअर करताना, "जेव्हा नार्निया प्रत्यक्षात अवतरतं. गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर लायन किंग समुद्राच्या लाटांचा आनंद घेतानाचा हा क्षण," अशी कॅप्शन दिली आहे. नार्निया हा एक हॉलिवडूपट असून त्यामध्ये सिंहाची कथा सांगण्यात आली आहे.


"ज्यांना रस आहे ते आशियाई सिंहांसंदर्भातील हा पेपर वाचू शकतात. ‘Living on the sea-coast: ranging and habitat distribution of Asiatic lions' असं या पेपरचं नाव असून पेपरचे लेख मोहन राम आणि इतर सहकारी आहेत. नेचरमध्ये हा पेपर प्रकाशित झाला आहे," असंही पवन खासवान यांनी सांगितलं आहे. या संसोधनाच्या पेपरमध्ये गीर राष्ट्रीय उद्यानामध्ये प्रमुख्याने आढळून येणाऱ्या आशियाई सिंहांसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. अनेकदा हे सिंह गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर दिसून येतात.



समुद्रकिनारी असलेल्या 4 जिल्ह्यांमध्ये आढळतात हे सिंह 


"हे सिंह डोंगरांगांबरोबरच वेगवेगळ्या वातावरणामध्ये आढळून येतात. उपग्रहांच्या मदतीने हे सिंह समुद्रकिनाऱ्याच्या आसपास आढळतात असंही समजलं आहे. 1990 च्या दशकामध्ये मधल्या काळात पहिल्यांदा सातपुड्यामध्ये सिंह आढळून आले. त्यानंतर ते समुद्रकिनारा असलेल्या 4 जिल्ह्यांत आढळून येतात," असं या अहवालामध्ये म्हटलं आहे. अनेकांना समुद्रकिनाऱ्यावरील हा फोटो पाहून आश्चर्य वाटलं आहे.