नवी दिल्ली: जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीनकडून पहिल्यांदाच सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. हा प्रश्न व्यवस्थित चर्चा करून सोडवला पाहिजे, अशी काहीशी सामंजस्याची भूमिका चीनने घेतली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी सोमवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली होती. यानंतर दुसऱ्याच दिवशी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी मसूद अजहरला दहशतवादी ठरवण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे, असे प्रसारमाध्यमांसमोर सांगितले. मात्र, यासाठी नेमका किती वेळ लागेल, हे चीनकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दहा वर्षांपासून भारताकडून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषेदत मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पुलवामा हल्ल्यानंतरही भारताने यासंदर्भात भारताने मांडलेला प्रस्ताव चीनने फेटाळून लावला होता. 


मात्र, आता चीनच्या या आडमुठ्या भूमिकेत बदल झाला आहे. बीजिंग येथे मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांना पत्रकारांनी यासंदर्भात प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी म्हटले की, हा प्रश्न पूर्ण चर्चा करूनच सोडवला पाहिजे, एवढेच आमचे म्हणणे आहे. सदस्यांचे बहुमत आणि संवादानंतरच आपण पुढे जाऊ शकतो, असे गेंग शुआंग यांनी सांगितले.



पुलवामा हल्ल्याचा चीनकडून तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला होता. त्यामुळे मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना साथ देईल, अशी अपेक्षा होती. मात्र, चीनने ऐनवेळी नकाराधिकार वापरून हा प्रस्ताव हाणून पाडला होता. मात्र, यानंतर अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सकडून सातत्याने चीनवर दबाव आणला जात आहे.