अयोध्या: अयोध्येत राम मंदिर व्हावं, ही प्रत्येक हिंदूची इच्छा आहे. त्यामुळे आता सरकारने राम मंदिर कधी बांधणार, याची तारीख सांगावी, असा थेट सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला. दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी अयोध्येत दाखल झालेल्या उद्धव ठाकरे यांनी लक्ष्मण किल्यावर जाऊन साधू-महंतांची भेट घेतली. यानंतर शरयू नदीच्या काठी महाआरतीसाठी रवाना होण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, मी राजकारण करण्यासाठी नव्हे तर कुंभकर्णाला उठवायला अयोध्येत आलो आहे. राम मंदिरासाठी किती वर्ष वाट बघणार. अयोध्येत राम मंदिर व्हावं ही प्रत्येक हिंदूची इच्छा आहे. त्यामुळे राम मंदिर कधी बांधणार यासाठी एकदाची तारीख जाहीर करून टाका, असा सवाल त्यांनी विचारला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम मंदिरासाठी केंद्र सरकार अध्यादेश काढणार असेल तर त्याला शिवसेनेचे नक्कीच समर्थन देईल. राम मंदिर बांधण्याचे मला श्रेय नको. राम भक्त म्हणून मी दर्शनासाठी येईल. राम मंदिराच्या प्रश्नावर हिंदू आता शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 


दरम्यान, शनिवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार शरयू नदीच्या तीरावर महाआरती केली. यावेळी शरयू नदीचा परिसर शिवसैनिकांच्या गर्दीने फुलून गेला होता. महाआरती संपन्न झाल्यानंतर उद्धव ठाकरे निवासस्थानाकडे रवाना झाले. रविवारी ते रामलल्लाचं दर्शन घेतील. यानंतर ते प्रसारमाध्यमे आणि जनतेशी संवाद साधणार आहेत. 


ठळक घडामोडी
 
​* शरयू नदीच्या काठावरील महाआरती संपन्न
​* शरयू नदीच्या किनाऱ्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची गर्दी
​* नदीकाठचा परिसर भगवे झेंडे, पताकांनी सजला
* उद्धव ठाकरे शरयू नदीच्या तीरावर, थोड्याचवेळात आरतीला सुरुवात
* राम मंदिराचा अध्यादेशासाठी शिवसेना नक्की समर्थन देणार- उद्धव ठाकरे 
* झोपलेल्या कुंभकर्णाला उठवायला इथे आलोय- उद्धव ठाकरे 
* राम मंदिर केव्हा बांधणार, तारीख सांगा- उद्धव ठाकरे 
* राम मंदिर झालंच पाहिजे- उद्धव ठाकरे
 * राम जन्मभूमी न्यासाचे महंत गोपालदास व्यासपीठावर दाखल
* उद्धव ठाकरे यांच्याकडून संत पूजनास सुरुवात
* शिवसैनिकांना मुंबईत परत आणणाऱ्या रेल्वेगाडीची वेळ बदलली, रात्री ११ वाजता गाडी सुटणार
 * अयोध्याः 'रामचरित मानस'चे उद्धव ठाकरे यांच्याकडून पूजन 
 * उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरे उपस्थित
  * उद्धव ठाकरे लक्ष्मण किला येथे दाखल