नियंत्रण रेषेवर भारतीय सेनेकडून ५ दहशतवाद्यांना कंठस्नान
गेल्या 36 तासांमध्ये 9 दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सेनेला यश आलं आहे.
कुपवाडा : केरन सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर भारतीय सेनेने 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. परंतु या दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान भारतीय सेनेचे 3 जवान शहीद झाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून नियंत्रण रेषेवर ही कारवाई सुरु होती. गेल्या 36 तासांमध्ये 9 दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सेनेला यश आलं आहे. तर चार दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
उत्तर काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये सुरू असलेल्या घुसखोरीविरोधी कारवाईदरम्यान सतर्क सैनिकांनी खराब हवामान आणि पर्वतीय मार्ग असूनही, नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 5 दहशतवाद्यांना ठार केलं आहे.
या कारवाईदरम्यान 3 जवान शहीद झाले असून दोन जखमी जवानांना जहाजाद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नियंत्रण रेषेवर अद्याप कारवाई सुरुच आहे.
दोन दिवसांपूर्वी 3 एप्रिल रोजी सकाळी केरन सेक्टरमधील एका भागात दहशतवाद्यांनी पाकिस्तानद्वारा युद्धबंदीचं उल्लंघन करत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जवानांनी दहशतवाद्यांचा हा डाव हाणून पाडला आणि त्यानंतर हा आज तिसऱ्या दिवशीही चकमक सुरु आहे.
दरम्यान, 4 एप्रिल रोजी दक्षिण काश्मीरमधील बटपुरा भागात झालेल्या एका चकमकीत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. तर शुक्रवारी उत्तर काश्मीरमधील हेंधवारामध्ये 4 दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
या वर्षात आतापर्यंत सुरक्षा दलाकडून 37 दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती आहे. तर 15 दहशतवादी आणि 71 दहशतवादी समर्थकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.