कोल्हापूर: कोल्हापूर आणि सांगलीत सध्या भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. चार दिवसांनंतरही दोन्ही जिल्ह्यांतील पुराचे पाणी ओसरायला तयार नाही. यामुळे निपाणी-कोल्हापूर महामार्गावरील अनेक गावेही पाण्याखाली गेले आहेत. यापैकी बेळगाव परिसरात असणाऱ्या यमगर्णी गावातील एक भन्नाट व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हीडिओत रस्त्यावर सर्वत्र पाणी साचलेले आहे. या पाण्यात स्थानिक लोक डीजे लावून नाचताना दिसत आहेत. एकीकडे पुरामुळे लोकांची दुर्दशा झाली असली तरी या परिस्थितीमध्येही लोक विरंगुळ्याचे काही क्षण शोधताना दिसत असल्याचे चित्र या व्हीडिओत दिसत आहे. 


गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे यमगर्णीनजीक नवीन पुलावर पाणी आल्याने कोल्हापूर आणि बेळगावकडे जाणारी वाहतूक बंद आहे. यमगर्णी नवीन पुलावर पाणी येण्याची ही पहिलीच घटना असून यामुळे यमगर्णीतील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. 



दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरग्रस्त कोल्हापूर, सांगलीची पाहाणी करणार आहेत. कृष्णा नदीची पाणी पातळी ५५ फुटांवर पोहोचल्याने स्थानिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढच्या तीन दिवसांत पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगलीत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या अडणचीत आणखी भर पडू शकते.