`मोदी खोटं बोलत आहेत! स्थानिक सांगतात की, चीनने...`; भारत-चीन सीमेवरुन राहुल गांधींचा गंभीर आरोप
PM Modi Is Lying Rahul Gandhi Over China Issue: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे सध्या लडाख दौऱ्यावर असून आत त्यांनी पँगाँग तलावाजवळ प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
PM Modi Is Lying Rahul Gandhi Over China Issue: काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी हे सध्या लडाखच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी पँगाँग येथील तलाव परिसराला भेट दिली. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर थेट भारत-चीन सीमेवरुन निशाणा साधला आहे. "लडाखमधील लोकांनी मला सांगितलं की येथे चिनी लष्कराने घुसखोरी केली आहे. गुरं चारण्यासाठी हे लोक जिथे जायचे तिथं आता त्यांना राजा येत नाही. लडाखमध्ये सगळेजण हेच सांगत आहे. पंतप्रधानांनी सांगितलं आहे की एक इंच जमीनही दिली नाही असं सांगत आहेत. मात्र हे खरं नाही. तुम्ही इथं कोणालाही विचारा ते सांगतील," असं राहुल गांधी म्हणाले.
स्थानिक लोक समाधानी नाहीत
राहुल गांधींनी लडाखमधील लोकांच्या अनेक तक्रारी असल्याचं सांगितलं. या लोकांना जो दर्जा देण्यात आला आहे त्यामुळे ते समाधानी नाहीत असं राहुल गांधी म्हणाले. त्यांना प्रतिनिधित्व हवं असून येथे बेरोजगारीची समस्याही मोठी आहे. राज्य नोकरशाहीच्या माध्यमातून नाही तर जनतेच्या माध्यमातून चाललं पाहिजे असंही स्थानिकांचं म्हणणं असल्याचं राहुल म्हणाले. अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला असून यामुळे स्थानिक समाधानी नसल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.
नक्की पाहा हे फोटो >> 170 kmph टॉप स्पीड अन् किंमत... राहुल गांधी ज्या बाईकवर लडाखला गेले तिचे फिचर्स पाहिलेत का?
कारगिललाही जाणार
राहुल गांधींनी त्यांचे वडील आणि देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या 77 व्या जयंतीनिमित्त लडाखमधील पँगाँग येथे गेले. त्यांनी पँगाँग त्सो तलावासमोर आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली. आपल्याला भारत जोडो यात्रेदरम्यानच लडाखला यायचं होतं असंही राहुल गांधी म्हणाले. मात्र लॉजिस्टीकसंदर्भातील गोष्टींमुळे मला ते जमलं नाही तेव्हाच सविस्तरपणे आपण लडाखचा दौरा करु असं ठरवलं होतं, अशी माहितीही राहुल गांधींनी दिली. आपण लेहला गेलो होतो. आता पँगाँगनंतर नुब्रा खोऱ्यात जाणार आहोत. त्यानंतर कारगिललाही जाणार असल्याचं राहुल गांधी म्हणाले. आपण येथील स्थानिकांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी आलो आहोत, असं राहुल गांधींनी सांगितलं.
बाईक राईड करत पँगाँगला
राहुल गांधी शनिवारी पँगाँगसाठी बाईक राईड करत रवाना झाले. "पँगाँगबद्दल माझे वडील सांगायचे की ती जगातील सर्वात सुंदर जागेपैकी एक आहे," अशा कॅप्शनसहीत बाईक राईडचे फोटो राहुल यांनी शेअर केले होते.
नक्की वाचा >> लडाखला Bike Ride साठी गेल्याबद्दल केंद्रीय मंत्र्याने मोदींनी टॅग करत मानले राहुल गांधींचे आभार, कारण...
राहुल गांधी एखाद्या प्रोफेश्नल बाईकरप्रमाणे हेल्मेट, ग्लोव्हज, रायडिंग बुट्स आणि जॅकेट अशा रायडर पोजमध्ये दिसले. लडाखच्या खोऱ्यातून बाईक राईडचा आनंद राहुल गांधींनी घेतल्याचं त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये पाहायला मिळाला. राहुल गांधी केटीएम 390 अॅडव्हेंचर बाईकने पँगाँगला पोहोचले.