अज्ञानापेक्षा अहंकार धोकादायक असतो, हे लॉकडाऊनने सिद्ध केले- राहुल गांधी
राहुल गांधींचे मोदी सरकारवर आणखी एक टीकास्त्र
नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर अल्बर्ट आईनस्टाईन यांचे एक वाक्य शेअर केले आहे. अज्ञानापेक्षा अहंकार धोकादायक असतो, असे आईनस्टाईन यांनी म्हटले होते. देशातील लॉकडाऊनने ही बाब पुन्हा एकवार सिद्ध केली, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
'देशात कोरोनाचा समूह संसर्ग झालाय, केंद्र सरकारने हे सत्य स्वीकारायला पाहिजे'
यापूर्वीही राहुल गांधी यांनी देशातील लॉकडाऊन बिनकामाचा ठरल्याचे टीकास्त्र सोडले होते. मध्यंतरी त्यांनी ट्विरवर कोरोनाच्या जगभरातील आकडेवारीचे काही आलेख (ग्राफ) शेअर केले होते. ज्या देशांमध्ये वारंवार लॉकडाऊन लादण्यात आला त्याठिकाणी काहीच फायदा झाला नाही. उलट कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली, याकडे राहुल गांधी यांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. तत्पूर्वी राहुल यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करताना म्हटले होते की, भारत चुकीची शर्यत जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.ही भयानक शोकांतिका व्यर्थ आणि निरुपयोगीपणा यांच्या घातक मिलाफाचा परिणाम असल्याचे राहुल ायंनी म्हटले होते.
भारतातील सहिष्णूतेचा DNA नाहीसा होत चाललाय- राहुल गांधी
गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वेग वाढला आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ११,५०२ नवे रुग्ण आढळून आले. कोरोना रुग्णसंख्येच्याबाबतीत भारत हा जगात तिसऱ्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे.भारतात सध्याच्या घडीला ३,३२,४२४ रुग्ण आहेत. तर आतापर्यंत ९,५२० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.