तिरूवअनंतपुरम  :  कोरोना व्हायरस आपले पाय पसरत असल्याने देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. देशातील काही राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण जास्त आहेत. केरळ राज्यातही कोरोना व्हायरस बाधितांचं प्रमाण जास्त आहे. नागरिकांचा एकमेकांशी संपर्क येणार नाही यावर केरळ सरकार जोर देत आहे, त्यासाठी केरळ सरकार स्वत:हून लोकांच्या घरी कॅश पोहोचवणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक भागात नागरीक बँक किंवा एटीएमला पैसे काढण्यासाठी जाऊ शकत नाहीत. तसेच स्पर्श टाळण्यासाठीही केरळ सरकार कॅश घरी पोहोचवण्याच्या विचारात आहे. यासाठी केरळ सरकारने पोस्ट खात्यासोबत करार केला आहे.


केरळचे अर्थमंत्री डॉ.टी.एम थॉमस इस्साक यांनी सोमवारी याची सुरूवात देखील केली, या करारानुसार काही ठराविक विभागात पोस्टमन लोकांना घराच्या दारापर्यंत जाऊन पैसे देणार आहेत. ज्या नागरिकांना ही सेवा हवी आहे, ते पोस्ट ऑफिसला फोन करून ही सेवा घेऊ शकतील.


पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, ८ एप्रिलपासून केरळ राज्यातले नागरीक पोस्ट ऑफिसला फोन करून ही सेवा घेऊ शकतात. यासाठी लोकांना आपलं नाव, बँकेचं नाव आणि किती पैसे हवे आहेत, याची मागणी नोंदावी लागणार आहे. यानंतर पोस्टमन तुमचे पैसे घरी दारापर्यंत घेऊन येणार आहे.


केरळच्या अर्थमंत्र्यांनी सांगितलं, या सेवेमुळे राज्यातील लोक बँक या कारणाने कमी बाहेर पडतील आणि बँक जाण्याचा त्यांचा वेळ वाचेल. ही सेवा आधार कार्डशी जोडली गेली आहे. यात आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम जोडलं गेलं आहे, यावरून एकूण ९३ बँका जोडल्या गेलेल्या आहेत. यावरून कोणत्याही ग्राहकाला आपली रक्कम बँकेतून सहज काढता येते.
 
मंत्र्यांनी हे देखील सांगितलं, मशीनला सॅनटायझरने साफ केलं जाणार आहे, आणि ग्राहकाला देखील आपले हात धुवावे लागणार आहेत. पोस्ट खात्याने यासाठी सॅनेटायझरची खरेदी देखील केली आहे. 


यात तुमचा आधार नंबर स्कॅन केल्यानंतर तुम्हाला हवे तेवढे पैसे काढता येणार आहेत. ग्राहकाची ओळख करण्यासाठी पोस्टमनसोबत आणलेल्या बायोमॅट्रीक डिव्हाईसवर आपलं बोट ठेवावं लागणार आहे. केरळच्या नागरीकांना जास्तच जास्त १० हजार एका वेळेस काढता येणार आहेत.