देशातील `या` भागांत सक्तीचा लॉकडाऊन; केंद्रीय गृह मंत्रालयाचे आदेश
कोरोनाची सद्यस्थिती पाहता घेतला निर्णय
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा coronavirus वाढता प्रादुर्भाव आणि त्यातून सावरणारी जनता ही एकंदर परिस्थिती पाहता केंद्रीय गृहमंत्रालयानं काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. केंद्रानंच आखून दिलेल्या ३० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमावलीत नव्यानं कोणत्याही प्रकारची मुभा न देण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला आहे.
उलटपक्षी प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटॅमिनेटेड झोनधमध्ये सक्तीचा लॉकडाऊन हा ३० नोव्हेंबरपर्यंत सुरुच राहील असे आदेश केंद्राकडून देण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारावर जिल्हास्तरीय पातळीवर प्रतिबंधित क्षेत्रांसंबंधीची माहिती घेण्यात येत आहे.
दरम्यान, पहिल्या ल़ॉकडाऊनपासून ठप्प झालेल्या अनेक सेवा प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर अनेक भागांमध्ये पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. या सर्व सेवा कोणत्याही बदलांविना सुरुच राहतील. काही महत्त्वाच्या नियमांचं पालन करत मेट्रो सेवा, लोकल सेवा, मनोरंजन स्थळं, हॉटेलं, रेस्तराँ, प्रशिक्षण केंद्र आणि धार्मिक स्थळंही सुरु राहणार आहेत.
सप्टेंबर ३० रोजी आलेल्या नव्या नियमांनुसार देशात खालील सेवा पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. या सेवा अशाच पद्धतीनं सुरु राहतील.
- आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक
- प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंसाठी जवतरण तलाव
- सिनेमागृह/ मल्टीप्लेक्स त्याच्या क्षमतेच्या ५० टक्के प्रमाणात सुरु राहतील
- सामाजिक, शैक्षणित आणि क्रीडा स्पर्धा असे कार्यक्रम स्टेडियम किंवा आयोजन स्थळाच्या ५० टक्के क्षमतेनं आयोजित केले जाऊ शकतात.
शिवाय आंततराज्यीय प्रवास, मालाची वाहतूक यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसतील असंही स्पष्ट करण्यात आलं.