नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचं संकट असतानाच आता दुसरीकडे आणखी एक संकट भारतावर घोंघावत आहे. हे संकट आहे स्थलांतरित धोकादायक टोळ किटकांचं. या टोळ नावाच्या किटकांनी भारतात प्रवेश केला आहे. या किटकांची एक मोठी झुंडच्या झुंड आधी एप्रिल महिन्यात पाकिस्तानमध्ये त्यानंतर भारतात आली आहे. ही टोळधाड शेतातील पिकांवर हल्ला करत पिकांची नासधुस करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 26 वर्षांत भारतात या किटकांना हा सर्वाधिक धोकादायक हल्ला असल्याचं बोललं जात आहे. या टोळधाडमुळे बळीराजा पुन्हा एका नव्या संकटात सापडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टोळ किटकांची ही झुंड अफ्रिकेतून यमनपर्यंत, त्यानंतर ईरान ते पाकिस्तानपर्यंत आली. पाकिस्तानात कित्येक हेक्टरवर पसरलेल्या कपाशीच्या शेतांवर हल्ला केल्यानंतर ही झुंड भारतात पोहचली आहे. जवळपास 8 ते 15 कोटी टोळ किटकाची ही झुंड 35,000 हून अधिक लोकांसाठी पुरेल इतकं पिकं नष्ट करु शकतात.


या किटकांची प्रजनन क्षमता विलक्षण असून ते लांब अंतरापर्यंतची उड्डाणं करण्यात पारंगत असतात. एकाच दिवसांत ते जवळपास 150 किलोमीटरपर्यंतचं अंतर पार करु शकतात. गेल्या एका वर्षात, या किटकांनी शेतातील एक तृतीयांश पीकाचं नुकसान केलं आहे. उन्हाळ्यातील पिके खाण्यासाठी, त्यावर हल्ला करण्यासाठी ही टोळधाड जवळपास जूनच्या आसपास भारतात येते, परंतु यावर्षी एप्रिलमध्येच ही टोळधाड भारतात आली.


या टोळधाडीने अनेक राज्यांच्या कृषि आधारित अर्थव्यवस्थेला धोक्यात आणलं आहे. या टोळधाडीपासून वाचण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याचं बोललं जातं. या किटकांना केवळ रात्रीच्याच वेळी, ते झाडांवर असताना नष्ट केलं जाऊ शकतं.


या समस्येपासून लढण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे. परंतु ग्लोबल वार्मिंगमुळे यांची संख्या अधिक आहे. टोळ किटक उन्हाळ्यापासून ते हिवाळ्यापर्यंत प्रजनन करु शकतात. टोळ किटकांनी अफ्रिका ते पश्चिम आशियापर्यंत जगाचा प्रवास केला आहे. जून 2019मध्ये टोळ ईराणमधून पाकिस्तानात पोहचले होते आणि कपाशीचं पिकं, गहू, मका आणि उन्हाळ्यातील इतर पिकांचं नुकसान केलं होतं. ही टोळधाड कमी होण्याची आशा होती परंतु टोळची संख्या वाढत, पसरत राहिली.