लखनऊ : उत्तरप्रदेशमध्ये भाजपला विरोधकांनी जोरदार धक्का दिलाय. भाजप आणि विरोधकांच्या एकत्रित ताकदीची कसोटी पाहणाऱ्या कैराना लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार पिछाडीवर आहे. तर दोन विधानसभा निवडणुकीत भाजप पराभवाच्या छायेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार हुकूमसिंह यांच्या निधनाने कैराना येथे लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. भाजपाने हुकूमसिंह यांची मुलगी मृगांका सिंग यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रीय लोकदलाकडून तबस्सूम हसन या रिंगणात आहेत. त्यांना समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष व काँग्रेसचा पाठिंबा दिला आहे. या मतदारसंघातील निकाल लोकसभेच्या २०१९ च्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल असे मानले जात आहे. हाती आलेल्या निकालानुसार भाजपच्या उमेदावर मृगांका सिंग या दोन हजार मतांनी पिछाडीवर आहेत. तर  राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवार तबस्सूम हसन यांना काँग्रेस, समाजवादी आणि बसप या तिन्ही विरोधी पक्षांनी पाठिंबा देत भाजपला आव्हान दिले.  तबस्सूम हसन या आघाडीवर आहेत.


कैरानामध्ये एकूण १७ लाख मतदार असून यापैकी ६१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतदारसंघात मुस्लीम, जाट व दलितांचे प्रमाण मोठया संख्येने आहेत. गोरखपूर आणि फुलपूरमध्ये विरोधकांच्या संयुक्त उमेदवारांनी भाजपचा पराभव केला होता. कैरानामध्येही राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवार तबस्सूम हसन यांना काँग्रेस, समाजवादी आणि बसप या तिन्ही विरोधी पक्षांनी पाठिंबा देत भाजपला आव्हान दिले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी या भागात जोरदार प्रचार केला होता. गोरखपूर आणि फुलपूरची पुनरावृत्ती कैरानात झाल्यास उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का असेल. त्यामुळे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची खरी कसोटी आहे.