मुंबई : 'भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांना मत देऊ नका आणि सत्तेतून बाहेर काढा ' असे आवाहन मनोरंजन क्षेत्राशी संबंधित 600 हून अधिक बड्या हस्तींनी केले आहे. अमोल पालेकर, नसीरुद्दीन शाह, गिरीश कर्नाड, एमके रैना आणि उषा गांगुली अशा महत्वाच्या व्यक्ती यामध्ये आहेत. भारत आणि संविधान धोक्यात असल्याचेही त्यांनी म्हटले. या कलाकारांतर्फे 12 भाषांमध्ये एक पत्र तयार करुन आर्टिस्ट युनाईट इंडीयाच्या वेबसाईट वर टाकण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आगामी लोकसभा निवडणूक देशाच्या इतिहासातील अधिक गंभीर निवडणूक असणार असल्याचे या पत्रात म्हटले आहे. या पत्रावर महेश एलकुंचेवार, महेश दत्तानी, अरुंधती नाग, किर्ती जैन, अभिषेक मजूमदार, कोंकणा सेन शर्मा, रत्ना पाठक शाह, लिलेट दुबे, मीता वशिष्ठ, मकरंद देशपांडे आणि अनुराग कश्यप यांच्या सह्या आहेत. 
आज गीत, नृत्य, हास्य धोक्यात आहे. आज आपले संविधानही धोक्यात आहे. जिथे तर्क, वाद आणि असहमती असते अशा संस्थांचा गळा दाबण्याचा प्रकार सरकारतर्फे होत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. 


लोकशाहीला सर्वात कमजोर आणि सर्वात वंचित लोकांनी सशक्त बनवायला हवे असे या पत्रात म्हटले आहे. संविधान आणि आपली सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्ष भावनेचे संरक्षण करा आणि कट्टरता, घृणा आणि निष्ठूरतेला सत्तेतून बाहेर काढा असे यात म्हटले आहे.