दोन मतदान ओळखपत्र बाळगल्या प्रकरणी गौतम गंभीरवर गुन्हा दाखल
आम आदमी पार्टीचे दिल्लीतील उमेदवार आतिशी यांनी ही तक्रार दिली आहे.
नवी दिल्ली : टीम इंडीयाचा माजी क्रिकेटपटू लोकसभेच्या रिंगणात उतरला असून तो भाजपातर्फे निवडणूक लढवत आहे. भाजपाने त्याला दिल्ली पूर्वतून उमेदवारी दिली आहे. राजकारणात येणार हे जाहीर केल्यापासूनच गौतम गंभीर राजकारण्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा बनला. दिल्लीतील सर्वात श्रीमंत उमेदावर ठरल्यानंतरही याबद्दल खूप चर्चा झाली. आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरीतही तो अडकू लागला आहे. गौतम गंभीरकडे दोन मतदान ओळखपत्र असल्याचा आरोप आम आदमी पार्टीतर्फे करण्यात आला आहे. यासदंर्भात गौतम विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. गौतम गंभीरने दिल्लीच्या करोल बाग आणि राजेंद्र नगर अशा दोन ठिकाणचे ओळखपत्र ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कलम 155 (2) अंतर्गत ही तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आम आदमी पार्टीचे दिल्लीतील उमेदवार आतिशी यांनी ही तक्रार दिली आहे.
जनप्रतिनिधित्व अधिनियम 1950 च्या कलम 17 नुसार कोणताही व्यक्ती दोनवेळा मत देऊ शकत नाही. कलम 31 अंतर्गत कोणत्या व्यक्तीचे दोन ठिकाणच्या मतदार यादीत नाव असेल तर त्याला एक वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. गौतमने निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केलेल्या माहितीत तो केवळ विधानसभा क्षेत्र राजिंदर नगर-39 येथे मतदान करण्यास पात्र असल्याचे सांगितले. पण करोल बाग-23 येथून मतदान करण्यास देखील त्याची नोंद असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. हे सत्य जाणूनबुजून लपवले गेले आणि निवडणूक आयोगाला चुकीची माहीती देण्यात आली. हा कलम 125 ए नुसार दंडनीय अपराध आहे. यामध्ये सहा महिन्यांपर्यंत तुरूंगवास होऊ शकतो. असे आम आदमीचे नेता आतिशी यांनी म्हटले आहे.
केवळ प्रसिद्धीचा फायदा घेण्यासाठी हा उमेदवार उभा केला गेला हे जनतेचे दुर्भाग्य आहे. या उमेदवारास कायदेशीर प्रक्रियेबद्दल काही माहिती नाही. पण याची किंमत पार्टीला आणि उमेदवाराला चुकवावी लागले. यावरून त्याला तुरूंगवास देखील होऊ शकतो असेही आतिशी म्हणाले.