प्रियंका गांधींच्या कपड्यांवरून भाजप नेत्याचं आक्षेपार्ह विधान
`काँग्रेसचे एक नेते जोर-जोरात विचारतात, अच्छे दिन आले? त्यांना अच्छे दिन दिसत नाहीत...`
मेरठ : लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर नेत्यांची एकमेकांवरच्या टीप्पणी जोरात सुरू आहे. एकमेकांवर वेगवेगळे आरोप करणं आणि चिखल उडवणं हे तर नेहमीचच झालंय. नेते आपण किती आणि काय कामं केलीत यापेक्षा विरोधी उमेदवार कसा योग्य नाही हे सांगण्यात जास्त धन्यता मानत आहेत. यावेळी, आपली पायरी सोडून विरोधी उमेदवारावर आक्षेपार्ह वक्तव्य करतानाही अनेक नेते दिसत आहेत. याच यादीत आता भाजप नेते जयकरण गुप्ता यांचंही नाव जोडलं गेलंय.
मेरठमध्ये झालेल्या एका निवडणूक सभेदरम्यान भाजप नेते जयकरण गुप्ता यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला. 'काँग्रेसचे एक नेते जोर-जोरात विचारतात, अच्छे दिन आले? त्यांना अच्छे दिन दिसत नाहीत... स्कर्ट परिधान करणारे आज साडी परिधान करून मंदिरात डोकं टेकवायला लागल्या... गंगाजलपासून दूर पळणारे लोक आज गंगाजलाचं आचमन करायला लागले...' असं म्हणत त्यांनी आगपाखड केली.
निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत आपली मर्यादा विसरून वक्तव्य करण्याची नेत्यांची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही उत्तर प्रदेशच्या संभलचे समाजवादी पक्ष जिल्हाध्यक्ष फिरोज खान यांनी रामपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांच्यावर अभद्र टिप्पणी केली होती. 'रामपूरमध्ये संध्याकाळ रंगीन होतील... रामपूरचे लोक माशाअल्लाह चांगले आहे, सभ्य आहेत कारण आझम खांनी यांची इतकी कामं केली आहेत... त्यामुळे लोक मतं तर समाजवादी पक्षालाच देतील. पण, मजा लुटण्यासाठी ते कोणतीही कसर बाकी ठेवणार नाहीत. कारण त्यांना एकदा संधी मिळालीय आणि ते हेच करतील.. मेरे पैरों में घुंघरू बांध तो फिर मेरी चाल और ठुमके देख लो' असं म्हणत आक्षेपार्ह टिप्पणी करत त्यांनी जयाप्रदा यांना निशाण्यावर घेतलं.
सपा जिल्हाध्यक्षांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनानं त्यांनी नोटीस धाडलंय. प्रकरण गंभीर होतंय हे लक्षात घेऊन ह्यातनगर पोलीस स्टेशनमध्ये फिरोज खान यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आलाय. इतकंच नाही तर महिला आयोगानंही त्यांना नोटीस धाडलीय.