नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या आसनसोलचे भाजपा खासदार बाबुल सुप्रियो यांनी केलेले ट्विट चर्चेचा विषय बनले आहे. त्यांनी एक फोटो इमेज ट्विट केली ज्यामध्ये 'येणार तर गांधीच' असे लिहिले असून त्याखाली थायलंड सरकार असेही लिहिले आहे. बाबूल यांच्या ट्विटने यातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. एक्झिट पोलच्या आकड्यात काँग्रेसला लोकसभा निवडणूकीत मोठे नुकसान होणार असल्याचे समोर आल्यानंतर बाबुल यांनी ही संधी साधली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


यामध्ये मदत करु शकत नाही पण शेअर नक्की करतोय. ज्यांनी कोणी हे बनवले असेल तो खूप प्रतिभाशाली आहे असे बाबुल यांनी ट्विटच्यावर म्हटले आहे. 16 मेला बाबुल यांनी महागठबंधनचा उल्लेख महाठगबंधन असा केला होता. भारतीय जनता महाठगबंधनच्या लोकांना मतदान करणार नाहीत कारण मतदार स्वत:ला राजकारणापेक्षा मोठे समजतात असे ते म्हणाले होते.


भाजपाच्या गोटात आनंद 



लोकसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचणीचे ( एक्झिट पोल) अंदाज समोर आल्यानंतर आता दिल्लीत भाजपनेही हालचाली करायला सुरुवात केली आहे. सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर रविवारी विविध संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाले होते. यापैकी बहुतांश एक्झिट पोलनी मोदी सरकार पुन्हा सत्तेत येईल, असे स्पष्ट संकेत दिले होते. त्यामुळे भाजपच्या गोटात कालपासून आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. तसेच अमित शहांकडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील ( रालोआ) नेत्यांना मंगळवारी दिल्लीत भोजनासाठी येण्याचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे भाजपकडून आता सत्तस्थापनेच्या हालचाली सुरु झाल्याचे दिसत आहे.