नवी दिल्ली : पहिल्या चरणाच्या मतदानाची तारीख जवळ येत असताना निवडणूक आयोग देखील कठोर कारवाई करताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मैं भी चौकीदार' कार्यक्रम लाईव्ह दाखवल्याने आयोगाने दूरदर्शनला नोटीस जारी केली आहे. 31 मार्चला प्रसारित झालेला हा कार्यक्रम दूरदर्शनने साधारण दीड तास लाईव्ह दाखवला. भारतीय जनता पार्टीच्या 'मैं भी चौकीदार' कॅम्पेन अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 मार्चला देशाच्या 500 ठिकाणांवरील लोकांना संबोधित केले होते. पंतप्रधानांचा हा कार्यक्रम दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये झाला होता. याचे प्रसारण रेडिओ, टीव्ही आणि सोशल मीडिया वर देखील झाले होते. यावरच निवडणूक आयोगाने आक्षेप नोंदवला. 


नमो टीव्ही वादात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दूरदर्शनला नोटीस पाठवण्यासोबतच निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदींच्या 'नमो टीव्ही' वर देखील आक्षेप नोंदवला आहे. आयोगातर्फे माहिती व प्रसारण केंद्राला यासंदर्भात नोटीस पाठवण्यात आली असून यासंबधी उत्तर मागितले आहे. लोकसभा निवडणूकच्या तोंडावरच चॅनल लॉंच का केले ? हे यामध्ये विचारण्यात आले. यावर माहीती व प्रसारण केंद्राने उत्तर दिले. नमो टीव्ही हे न्यूज चॅनल नसून जाहीरात आहे. ते आपापल्या स्तरावर जारी करण्यात आले आहे. यासाठी परवानगीची गरज नाही. चॅनलचा संपूर्ण खरच संबंधित पार्टी म्हणजेच भारतीय जनता पार्टी करत आहे. 


‘मैं भी चौकीदार’ कॅम्पेनवर याआधी देखील निवडणूक आयोगाने आक्षेप नोंदवला होता. ‘मैं भी चौकीदार’ची जाहीरात छापलेल्या कपांमधून रेल्वेमध्ये चहा वाटण्यावरही आक्षेप नोंदवण्यात आला. याव्यतिरिक्त पंतप्रधान मोदींचा फोटो असलेल्या बोर्डींग पासवरही प्रश्न उपस्थित झाले. 



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आणि आतापर्यंतच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रकाश टाकणाऱ्या पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाच्या अडचणी प्रदर्शनापूर्वीच वाढल्या होत्या. काँग्रेसच्या काही प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाची भेट घेत  आगामी लोकसभा निवडणूकांच्या पूर्वी या चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली. या चित्रपटाचं कथानक आणि मुळ हेतू हा पूर्णपणे राजकीय असल्याची बाब त्यांच्याकडून मांडण्यात आली. पण निवडणूक आयोगाने या सिनेमाला हिरवा कंदील दिला असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.