बाबरी मशीद वक्तव्यावरून प्रज्ञा सिंह यांना निवडणूक आयोगाची नोटीस
साध्वी प्रज्ञा २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहेत.
नवी दिल्ली : शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन नंतर माफी मागणाऱ्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. माझ्या शापामुळेच करकरेंचा अंत झाल्याचे बेजबाबदार विधान प्रज्ञा सिंह यांनी केले होते. यावरून देशभरात संतापाची लाट पसरली. त्यानंतर त्यांना या वक्तव्या बद्दल माफी मागावी लागली. दरम्यान बाबरी मशीद वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आाहे. साध्वी प्रज्ञा २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहेत. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. भाजपने प्रज्ञा यांना भोपाळ मतदारसंघातून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात रिंगणात उतरवले आहे. या उमेदवारीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
मी बाबरी मशीदीच्या वर चढले होते आणि मशीद पाडण्यास मदत केली होती असे वक्तव्य प्रज्ञा सिंह यांनी केले होते. निवडणूक आयोगाने तात्काळ आक्षेप घेत आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस जारी केली. मध्य प्रदेशचे मुख्य निर्वाचन अधिकारी वी एल कांता राव यांनी ही कारवाई केली.
शनिवारी भोपाळमध्ये झालेल्या एका टीव्ही शो दरम्यान प्रज्ञाने वादग्रस्त विधान केले. राम मंदीर निश्चित बांधणार आणि हे एक भव्य मंदीर असेल असा पुनरोच्चार तिने केला. बाबरी मशीदचा ढाचा तोडण्यास ईश्वराने मला ताकद आणि संधी दिली याबद्दल मला गर्व आहे असे प्रज्ञा म्हणाली. एकमेकांविरोधात ज्या तक्रारी आयोगाकडे येत आहेत त्यावरून नेते भडकाऊ भाषण देत असल्याचे स्पष्ट होत आहे हे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. यामुळे समाजात द्वेष पसरत असल्याचेही आयोगाने म्हटले आहे.
करकरे यांनी मला विनाकारण मालेगाव बॉम्बस्फोटात गोवले. त्यांनी मला प्रचंड यातना दिल्या. त्यांचा मृत्यू त्यांच्या कर्मामुळेच झाला. मी त्यांना तुमचा सर्वनाश होईल, अशा शाप दिला होता. तो अखेर खरा ठरला, असे वक्तव्य साध्वी यांनी केले होते. साध्वी यांच्या या विधानाने देशभरात मोठी खळबळ माजली. अनेकांनी साध्वी प्रज्ञा आणि भाजपवर सडकून टीकाही केली होती. या पार्श्वभूमीवर भाजपने पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली होती. या पत्रकात भाजपने म्हटले आहे की, आमच्यासाठी करकरे शहीदच आहेत. साध्वी यांचे मत वैयक्तिक आहे. कदाचित तुरुंगात असताना भोगाव्या लागलेल्या शारीरिक आणि मानसिक हालअपेष्टांमुळे त्या अशाप्रकारे व्यक्त झाल्या असाव्यात, अशी सारवासारव भाजपने केली होती.