उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा अडचणीत आले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग पुन्हा एकदा आदित्यनाथ यांच्यावर ७२ तासांची प्रचारबंदी घालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळेस त्यांनी महाआघाडीचे उमेदवार शफिकुर्रहमान बर्क यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. 19 एप्रिलला झालेल्या सभेत योगी आदित्यनाथ यांनी विधान केले आहे. जे स्वत:ला बाबरची औलाद म्हणतात अशा दहशतवाद्यांकडे तुम्ही देशाची सत्ता देणार का ? बजरंगबली ला विरोध करणाऱ्यांना तुम्ही सत्ता देणार का ? असे प्रश्न योगी आदित्यनाथ यांनी उपस्थित केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ यांच्यावर 72 तासांची प्रचारबंदी घातली होती. त्यानंतर प्रचारात उतरलेल्या योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले. याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्यानंतर आयोगाने कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ यांना नोटीस पाठवून २४ तासांत उत्तर देण्यास सांगितले. संभळ मतदारसंघातील प्रचारसभेत केलेल्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ यांना ही नोटीस पाठवली आहे.



याआधी देखील योगी आदित्यनाथ यांच्यावर ७२ तासांची प्रचारबंदी करण्यात आली होती. मेरठच्या प्रचार सभेत अली आणि बजरंगबली यांच्या बद्दल योगींनी वादग्रस्त विधान केले होते.