नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर हा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. भाजपने गौतम गंभीरला पूर्व दिल्लीमधून उमेदवारी दिली आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार गौतम गंभीर हा दिल्लीतला सगळ्यात श्रीमंत उमेदवार आहे. गौतम गंभीरची एकूण संपत्ती १४७ कोटी रुपये एवढी आहे. यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्तेचा समावेश आहे. तसंच गौतम गंभीरकडे ५ चारचाकी आणि एक दुचाकी गाडी आहे. २०१७-१८ साली गंभीरने प्राप्तिकर परताव्यामध्ये १२.४० कोटी रुपये एवढं वार्षिक उत्पन्न दाखवलं होतं. पूर्व दिल्लीमधून गौतम गंभीरचा सामना आपच्या आतिशी यांच्याशी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम दिल्लीचे काँग्रेसचे उमेदवार महाबली मिश्रा हे दिल्लीतले दुसरे श्रीमंत उमेदवार आहेत. महाबली मिश्रा यांच्याकडे जवळपास ४५ कोटींची संपत्ती आहे.


भाजपकडून दिल्ली ईशान्य मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या गायक हंस राज हंस यांनी प्राप्तिकर परताव्यामध्ये आपलं २०१७-१८चं उत्पन्न ९.२८ लाख रुपये एवढं दाखवलं आहे. हंस राज हंस यांच्यासमोर उभे असलेल्या काँग्रेस उमेदवार राजेश लिलोथिया यांचं २०१७-१८चं उत्पन्न २६.३४ लाख रुपये होतं.


बॉक्सर विजेंदर सिंग याला काँग्रेसने दक्षिण दिल्लीतून उमेदवारी दिली आहे. विजेंदर सिंग याची एकूण मालमत्ता १२.१४ कोटी रुपये आहे. यातली ३.५७ कोटी रुपये जंगम आणि ५.०५ कोटी रुपये स्थावर मालमत्ता आहे.


काँग्रेस नेत्या दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दिक्षीतही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. शिला दिक्षीत यांची एकूण संपत्ती ४.९२ कोटी रुपये एवढी आहे. २०१७-१८ साली शिला दिक्षीत यांचं उत्पन्न १५ लाख रुपये होतं. शिला दिक्षीत यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे निझामुद्दीन भागामध्ये एक अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटची किंमत जवळपास १.८८ कोटी रुपये एवढी आहे.